पीटीआय, मुंबई
एअर इंडियाच्या ‘एआय १७१’ या दुर्घटनाग्रस्त विमानाचे वैमानिक आव्हानात्मक परिस्थितीमध्ये जबाबदारीने वागले असे म्हणत ‘इंडियन कमर्शियल पायलट्स असोसिएशन’ने (आयसीपीए) त्यांची पाठराखण केली आहे. केवळ अटकळींच्या आधारे विमानाचे मुख्य वैमानिक कॅप्टन सुमीत सभरवाल आणि सहवैमानिक क्लाइव्ह कुंदर यांची बदनामी करू नये असे ‘आयसीपीए’ या एअर इंडियाच्या वैमानिकांच्या संघटनेने म्हटले आहे.
अहमदाबादहून लंडनला जाणारे बोइंग ७८७ ड्रीमलायनर विमान १२ जूनला उड्डाण केल्यानंतर काही सेकंदांनी वैद्याकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावर कोसळले होते. अपघाताचा तपास करणाऱ्या ‘विमान अपघात अन्वेषण विभागा’ने (एएआयबी) आपला प्राथमिक अहवाल शनिवारी प्रसिद्ध केला.
हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर काही जणांनी हा अपघात म्हणजे वैमानिकाने केलेली आत्महत्या आहे असे म्हटले. ‘आयसीपीए’ने या प्रकारच्या तर्कवितर्कांवर जोरदार आक्षेप घेतला आहे. जोपर्यंत अधिकृतरित्या तपास पूर्ण होत नाही आणि अंतिम अहवाल प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे अंदाज व्यक्त करणे अस्वीकार्य आहे आणि त्याचा निषेध केला पाहिजे असे ‘आयसीपीए’ने नमूद केले.
दरम्यान, या तपासामध्ये आपल्या सदस्यांनाही सहभागी करून घ्यावे या मागणीसाठी कायदेशीर मार्गाचा विचार करत असल्याचे ‘एअरलाइन पायलट्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने (एएलपीए-इंडिया) रविवारी सांगितले. या संघटनेचे सदस्य सोमवारी नागरी विमान वाहतूक महासंचालकांची भेट घेणार आहेत.
विमान उड्डाणासाठी उच्च मापदंड
‘आयपीसीए’ने सांगितले की, वैमानिकांची व्यापक मानसिक आणि व्यावसायिक तपासणी केली जाते, त्यांना सातत्याने प्रशिक्षण दिले जाते आणि ते सुरक्षा, जबाबदारी आणि मानसिक क्षमतेच्या सर्वोच्च मानकाअंतर्गत काम करतात. ‘एएआयबी’च्या अहवालानुसार, दुर्घटनाग्रस्त विमानाचे सुमीत सभरवाल आणि क्लाइव्ह कुंदर यांनी उड्डाणापूर्वी २४ तास विश्रांती घेतली होती तसेच श्वसन चाचणीमध्ये सर्व कर्मचारी उत्तीर्ण झाले होते.
या टप्प्यावर अशा प्रकारच्या दाव्यांना काहीही आधार नाही आणि अपूर्ण किंवा प्राथमिक माहितीच्या आधारावर अशा प्रकारचे गंभीर आरोप करणे हे केवळ बेजबाबदारपणाचेच नाही तर संबंधित व्यक्ती व त्यांच्या कुटुंबांप्रति अतिशय असंवेदनशील वर्तन आहे.– ‘आयसीपीए’