हैदराबाद : उस्मानिया विद्यापीठाला विद्यार्थी राजकारणाची अनेक दशकांची परंपरा आहे. मात्र, या विद्यापीठाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना ७ मे रोजी एका ‘अराजकीय’ कार्यक्रमासाठी विद्यापीठ परिसरात भेटीची परवानगी नाकारल्याचे वृत्त आहे.

विद्यापीठाने कार्यक्रमाच्या आयोजकांना आपला निर्णय लेखी कळवलेला नसला, तरी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने शनिवारी दिलेल्या नकारामुळे राजकीय खळबळ माजली आहे. तेलंगण राष्ट्र समितीच्या (टीआरएस) नेतृत्वाखालील सरकारने गांधी यांची भेट रोखण्यासाठी विद्यापीठावर दबाव आणल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. गांधी यांच्या भेटीला परवानगी देण्याचे निर्देश विद्यापीठाला द्यावेत यासाठी काही विद्यार्थ्यांनी त्याच दिवशी तेलंगण उच्च न्यायालयात धाव घेतली.

ही भेट ‘अराजकीय’ स्वरूपाची असल्याचे सांगून आपण या कार्यक्रमासाठी २३ एप्रिललाच अर्ज केला होता, असे काँग्रेस नेत्यांनी रविवारी सांगितले. मात्र, विद्यापीठ परिसरात राजकीय बैठकांसह शिक्षणेतर कार्यक्रमांना बंदी घालणारा ठराव कार्यकारी परिषदेने २०१७ मध्ये  केला आहे, याकडे प्रशासकीय अधिकाऱ्याने लक्ष वेधले.

युवक काँग्रेसने उस्मानिया विद्यापीठाच्या कला महाविद्यालयात शनिवारी निदर्शने केली, तर अ.भा. विद्यार्थी परिषद आणि टीआरएसशी संलग्न विद्यार्थी संघटनेने त्यांना प्रत्युत्तर म्हणून निदर्शने केली. प्रशासनाने या निर्णयाबाबत अद्याप विद्यार्थ्यांना लेखी कळवलेले नाही, असे तेलंगण निरुद्योग विद्यार्थी संयुक्त कृती समितीचे मानवत रॉय यांनी सांगितले.