पाकिस्तानातील पारंपरिक पेशावरी चप्पलांना आता आंतरराष्ट्रीय फॅशन जगताच्या वाटेवर दमदार पाऊल टाकले असले तरी  ब्रिटिश फॅशन डिझायनर सर पॉल स्मिथ यांनी मूळ नाव लपवून ‘रॉबर्ट’ नावाने हीच चप्पल तब्बल ५०पट जादा किंमतीत विकायला सुरुवात केल्याने पाकिस्तानात संतापाची लाट उसळली आहे. समाजमाध्यमांचा आधार घेऊन पाकिस्तानने प्रथमच स्मिथविरोधात ऑनलाइन युद्ध छेडले आहे!
सर स्मिथ यांनी या चपलेत केवळ एक गुलाबी पट्टी लावण्यापुरता किरकोळ बदल केला आणि ती पेशावरी चप्पल असल्याचे लपवून ‘रॉबर्ट’ नावाने विकायला सुरुवात केली, असा पाकिस्तानचा आरोप आहे. पाकिस्तानात उत्पादक ज्या किमतीला ती विकतात त्यापेक्षा तब्बल ५० पट आणि किरकोळ विक्रेते बाजारात ती ज्या किमतीला विकतात त्यापेक्षा २०पट अधिक म्हणजे ३०० पौंडांना ही चप्पल स्मिथ विकत असल्याने पाकिस्तानातील चर्मोद्योगातही नाराजी आहे.
चेंज डॉट ऑर्ग नावाने ऑनलाइन पेज सुरू झाले आहे. यात स्मिथ यांच्या कंपनीने या चपलेची विक्री ‘पेशावरी चप्पल’ या नावानेच करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीला अल्पावधीत ७५० नेटकरांचे अनुमोदनही मिळाले आहे.
या उद्रेकानंतर पॉल स्मिथ यांच्या कंपनीच्या संकेतस्थळावर आपल्या चपलेची प्रेरणा पेशावरी चप्पल असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
८०च्या दशकांत वलयांकित क्रीडापटु इम्रान खान याने टीशर्ट आणि निळ्या जिन्ससोबत या चपला घालायला सुरुवात केल्यानंतर त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरही वलय लाभले होते.  एकेकाळच्या कडक चामडय़ाच्या या चपलांनी आता कालानुरूप कात टाकली असून
वेगवेगळ्या नक्षीदार रंगसंगतीने नटलेल्या या चपला म्हणजे पाकिस्तानचे स्वयंघोषित राष्ट्रीय पादत्राण ठरल्या आहेत. सलवार कमीज या राष्ट्रीय पोषाखासोबत या चपला अलगद चपखल बसल्या आहेत.

पठाणी पावलांचा सोबती!
पाकिस्तानातील वायव्य सरहद्द प्रांतातील पठाणांच्या पावलांनी प्रथम या दणकट चामडय़ाच्या चपलांबरोबर पायपीट सुरू केली. पेशावर या गावावरूनच प्रसिद्ध असलेल्या या चपलांची निर्मिती नेमकी कधी सुरू झाली, याचा तपशील इतिहासालाही अज्ञात आहे. तरी आज मात्र पाकिस्तानात सर्वाधिक वापराचा मान याच चपलांना आहे.