पीटीआय, जेरुसलेम
हमासच्या ताब्यात बंदिवान असलेल्या सहा ओलिसांचे मृतदेह रविवारी इस्रायलने ताब्यात घेतल्यानंतर ओलीस तरुणांच्या कुटुंबीयांसह इस्रायली नागरिकांनी संताप व्यक्त केला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू झाली असून या हत्याकांडाला नेतान्याहू जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. युद्धविराम करार झाला असता तर ओलिसांची सुटका झाली असती, असे मत इस्रायली नागरिकांनी व्यक्त केले.
दक्षिण गाझामधील रफाह शहरातील एका बोगद्यातून सुमारे एक किलोमीटर अंतरावर ओलिसांचे मृतदेह सापडले. याच ठिकाणाहून गेल्या आठवड्यात फरहान अल्कादी या ओलिसाची जिवंत सुटका करण्यात आली होती. मात्र रविवारी इस्रायली सैनिक घटनास्थळी पोहोचण्याच्या आधी काही वेळापूर्वीच हमासच्या दहशतवाद्यांनी या ओलिसांची निर्घृण हत्या केली. या वृत्तानंतर ओलिसांच्या कुटुंबीयांनी मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केला असून युद्धविराम करार करण्यात आला असता तर सहा जण जिवंत राहू शकले असते, अशी भावना व्यक्त केली. गेल्या १० महिन्यांपासून इस्रायल-हमास युद्ध सुरू असून युद्धविराम कराराच्या केवळ वाटाघाटी सुरू आहेत. लवकरच युद्ध थांबवावे, अशी मागणी करत इस्रायली नागरिकांनी जोरदान निदर्शने केली.
हेही वाचा >>>Uttar Pradesh : लखनौमधील विद्यापीठात विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, वसतीगृहात आढळला IPS अधिकाऱ्याच्या मुलीचा मृतदेह
या ओलिसांपैकी हर्ष गोल्डबर्ग-पॉलिन हा २३ वर्षीय इस्रायली-अमेरिकी तरुण असून त्याच्या पालकांनी जागतिक नेत्यांची भेट घेऊन त्याच्या सुटकेसाठी दबाव आणला होता. पॉलिन हा त्याच्या चार मित्रांसह एका संगीत कार्यक्रमातून परतताना हमासच्या दहशतवाद्यांनी त्यांना ताब्यात घेतले होते, तर एका ४० वर्षीय शेतकऱ्याला बेरी येथून ताब्यात घेतले होते.
दरम्यान, हमासने ओलिसांच्या मृत्यूचा दोष इस्रायल आणि अमेरिकेला दिला. इस्रायलने युद्धविराम प्रस्ताव स्वीकारला असता तर ओलीस ठेवलेले तरुण आता जिवंत असते, असे हमासकडून सांगण्यात आले.
नेतान्याहू यांनी आरोप नाकारले
ओलिसांच्या हत्येनंतर नेतान्याहू यांनी दु:ख व्यक्त केले. या हत्याकांडावरून हे दिसून येते की, हमासला युद्धबंदी नको आहे. हमासने थंड डोक्याने या ओलिसांची हत्या केली. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. इस्रायलकडून युद्धविरामासाठी प्रयत्न केले जात असून या प्रयत्नांना खीळ घालण्याचा प्रयत्न हमासकडून केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. इस्रालयी नागरिकांकडून करण्यात आलेले आरोप त्यांनी नाकारले.