Anti-Immigration Protest in London : सेंट्रल लंडनमध्ये शनिवारी यूकेच्या इतिहासातील सर्वात मोठे उजव्या विचारसरणीचे आंदोलन पाहायला मिळाले, ज्यामध्ये १ लाखापेक्षा जास्त आंदोलकांनी सहभाग घेतला. ज्यामध्ये स्थलांतर विरोधी अतिउजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते टॉमी रॉबिन्सन यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी अनेक पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ले झाल्याचे देखील दिसून आले. ‘युनाईट द किंगडम’ मार्च म्हणून काढण्यात आलेल्या या रॅलीत अंदाजे १,१०,००० जण सहभागी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
लंडनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या टॉमी रॉबिन्सन यांच्या या रॅलीबरोबरच ‘स्टँड अप टू रेसिझम’ नावाने एक प्रति-आंदोलन देखील करण्यात आले ज्यामध्ये सुमारे पाच हजार लोक सहभागी झाले होते. या दोन्ही गटामध्ये संघर्ष टाळण्यासाठी मेट्रोपॉलिटन पोलिसांना दिवसभरात अनेकवेळा हस्तक्षेप करावा लागला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आंदोलनादरम्यान अनेक पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली. यानंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्तात वाढ करण्यात आली. यावेळी प्रोटेक्टिव्ह गिअर घातलेले अधिकारी आणि माउंटेड युनिट्स यांना देखील तैनात करण्यात आले. निदर्शने सुरू असतानाच पोलिसांनी याबद्दल माहिती दिली होती.
या निदर्शनांदरम्यान स्थलांतरितांना आश्रय देणाऱ्या हॉटेल्सच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. यामध्ये सहभागी झालेल्या लोकांनी यूनियन जॅक आणि लाल-पांढऱ्या रंगाचे सेंट जॉर्ज क्रॉस असलेले ध्वज फडकावले. काही आंदोलकांनी अमेरिकन आणि इस्रायलचे ध्वजही हातात घेतले होते.
अनेक निदर्शकांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधित ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ लिहिलेल्या टोप्या देखील घातल्या होत्या. पंतप्रधान केयर स्टारमर यांच्यावर टीका करत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली. तर काहींनी ‘सेंड देम होम’ असे लिहिलेले बॅनर्स देखील हातात घेतले होते.
अतिउजव्या विचारसरणी असलेले कार्यकर्ते टॉमी रॉबिन्सन म्हणजेच स्टीफन यॅक्सले-लेनॉन (Stephen Yaxley-Lennon) यांनी ‘युनाईट द किंगडम’ हा मोर्चा म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उत्सव असल्याचे म्हटले आहे. तसेच या निदर्शनांदरम्यान काही दिवसांपूर्वी गोळी झाडून हत्या करण्यात आलेल्या चार्ली कर्क यांना देखील श्रद्धांजली वाहण्यात आली.
संपूर्ण लंडनमध्ये शनिवारी मेट्रोपोलिटन पोलिसांनी सुमारे १,६००० हून अधिकारी तैनात केले होते, ज्यामध्ये ५०० अधिकारी हे दुसऱ्या दलातून आणण्यात आले होते. दोन आंदोलनांचे नियोजन करतान पोलिसांना काही हाय-प्रोफाइल फुटबॅल सामने आणि शहरात इतर ठिकाणी असलेल्या कॉन्सर्टवर देखील लक्ष ठेवावे लागले.
इंग्लंडच्या राजकीय वर्तुळात देशाच्या संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेचा मुद्दा मागे पडून स्थलांतरितांचा मुद्दा हा विशेष चर्चेत राहिला आहे. यूकेमध्ये विक्रमी स्वरूपात asylum क्लेम पाहायला मिळत आहेत. या वर्षी आतापर्यंत २८,००० हून अधिक स्थलांतरित इंग्लिश चॅनेल पार करून लहान बोटींमधून देशात दाखल झाले आहेत.