अमेरिकेत उत्तर भारतीय गावांमधून २६०० वैदिक पंडितांना आणण्यात आले होते. गेल्या काही वर्षांत यापैकी १३० जण बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले आहे, अशी माहिती आयोवा येथील महर्षी महेश योगी संस्थेतर्फे देण्यात आली. मात्र या प्रत्येकाचा तपशील इमिग्रेशन अंमलबजावणी संचालनालयाकडे देण्यात आला आहे, असेही संस्थेच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.
एका वैदिक शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने २६०० जणांना सुमारे पाच वर्षांपूर्वी भारतातून अमेरिकेत आणण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या पहिल्या चार वर्षांमध्ये ‘बेपत्ता’ होण्याच्या फारशा घटना नव्हत्या, मात्र गेल्या काही महिन्यांत या घटनांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे,
 एकूण वैदिक पंडितांपैकी सुमारे पाच टक्के जण ‘विनापरवाना गैरहजर’ राहिले आहेत. परिणामी त्यांना बेपत्ता म्हणून जाहीर करण्यात आले आहे, असे महर्षी व्यवस्थापन विद्यापीठाच्या ‘जागतिक विकास’ विभागाचे अधिष्ठाता असलेल्या विलियम गोल्डस्टीन यांनी सांगितले.
आरोप, प्रत्यारोप आणि शक्यता..
महर्षी महेश योग विद्यापीठात आणण्यात आलेल्या वैदिक पंडितांना अपमानास्पद वागणूक मिळत होती आणि त्यांना पुरेसा मोबदलाही मिळत नव्हता, असा आरोप विद्यापीठावर करण्यात येतो. मात्र विलियम यांनी तो आरोप स्पष्टपणे फेटाळून लावला.  
उलट अधिक मानधनाचे गाजर दाखवीत त्यांची फसवणूक झाली असावी, असा आरोप गोल्डस्टीन यांनी केला. तसेच हे आर-१ व्हिसावर अमेरिकेत आल्यामुळे त्यांना किमान वेतनाचा कायदा लागू होत नसल्याचेही स्पष्ट केले.
असे उलगडले प्रकरण..
शिकागो येथील, ‘हाय इंडिया’ नावाच्या साप्ताहिकाने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. अमेरिकेत आणण्यात आलेल्या १६३ वैदिक पंडितांवर अत्यंत वाईट परिस्थिती ओढवली असून त्यांना प्रति तास ७५ सेंट्सहूनही कमी मानधन दिले जात असल्याचा आरोपही या नियतकालिकात करण्यात आला होता.