चेन्नई : चेन्नईच्या उत्तर भागात एन्नोर येथील खतनिर्मिती प्रकल्पा समुद्रात जाणाऱ्या उपवाहिनीतून मंगळवारी रात्री उशिरा अमोनिया वायूची गळती झाली. या गळतीमुळे नागरिकांना अस्वस्थता, धाप लागणे, श्वासोच्छवासास अडचण, मळमळ अशा समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यानंतर सुमारे २५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. ही घटना मगंळवारी रात्री उशिरा ११ वाजून ४५ मिनिटांनी घडली. परिसरात वायू पसरल्याने नागरिकांत मोठी घबराट पसरली. त्यांची कोंडी झाली. वायूच्या दुष्परिणामामुळे बाधितांच्या घसा आणि छातीत जळजळ होऊ लागली आणि अनेक जण बेशुद्ध पडले. वायूगळतीची माहिती मिळताच अनेक जण घाबरून घराबाहेर पडले आणि रस्त्यावर जमा झाले. खत निर्मिती प्रकल्पाच्या आसपास राहणाऱ्या २५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यात लहान मुलांचाही समावेश आहे. मच्छिमार गावांच्या प्रतिनिधींनी सांगितले की, उत्तर चेन्नईतील चिन्नाकुप्पम, पेरियाकुप्पम, नेताजीनगर आणि बर्मानगर या भागांना या वायूगळतीचा फटका बसला आहे.

हेही वाचा >>> ‘मेक इन इंडिया’अंतर्गत शस्त्रनिर्मितीस रशिया तयार; जयशंकर यांच्या भेटीनंतर रशियाचे परराष्ट्रमंत्री लावरोव्ह यांचे प्रतिपादन

मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर स्थानिकांना वाहने मिळवून या भागापासून दूर जाण्यासाठी मोठी गैरसोय सहन करावी लागली. अनेकांनी रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी ऑटोरिक्षा, मोटारसायकल असा जमेल त्या वाहनांचा वापर केला. तामिळनाडूच्या आरोग्यमंत्री मा सुब्रमण्यम यांनी येथील सरकारी स्टॅनले मेडिकल कॉलेज हॉस्पिटलला भेट दिली आणि वायूगळतीने पीडित रुग्णांशी आणि रुग्णालयातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिस्थिती त्वरित पूर्वपदावर

नियमित प्रक्रियेचा एक भाग म्हणून या प्रक्रियेची देखरेख करताना आम्हाला २६ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी खतप्रकल्पाच्या बाहेरील भागात अमोनिया उत्सर्जित करणाऱ्या समुद्री उपवाहिनीत बिघाड आढळला. त्यानंतर मानक कार्यप्रणाली त्वरित कार्यान्वित करण्यात आली. आम्ही ताबडतोब अमोनिया प्रणाली सुविधेला विलग केले.  कमीत कमी वेळात परिस्थितीवर नियंत्रण मिळवत ती पूर्वपदावर आणली. – कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड, (मुरुगप्पा समूहातील कंपनी)