आग्रा जिल्ह्य़ात खैरगड येथे ७० माकडांचा मृत्यू झाला. ३१ माकडांचे सांगाडे सय्यद भागात शुक्रवारी सापडले असून इतर सांगाडे जागनेर व जीजान तालुक्यात सापडले आहेत. खैरागडचे उपविभागीय दंडाधिकारी राम सिंग गौतम यांनी सांगितले, की २७ माकडांचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्यांना विष घातल्याचे स्पष्ट झाले आहे. इतर माकडांचेही शवविच्छेदन केले जाणार आहे.
शुक्रवारी उत्तर प्रदेश वन विभागीय रेंजर दलचंद शामरॉन यांच्या तक्रारीवरून प्राथमिक माहिती अहवाल सय्यान पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तींविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० या कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे.
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सय्यान पोलिस स्टेशन समोर निदर्शने केली. सोमवारी सकाळी त्यांनी चौकशीची मागणी केली. पर्यावरणवादी श्रावणकुमार सिंह यांनी, ‘माकडे स्वत:हून मरणार नाहीत व दफन करून घेणार नाहीत’ असे म्हटले आहे. त्यांना कुणीतरी मारून दफनही केले होते.