पाकिस्तानात मान्सूनच्या पावसामुळे आलेल्या पुराने किमान १४० जणांचा बळी घेतला असून १० लाख लोकांना त्याचा फटका बसला आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांताला या पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. पाकिस्तान सरकारच्या आपत्कालीन नियंत्रण यंत्रणेने ही माहिती जाहीर केली आहे.
राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, या महापुरामुळे १४० जण ठार झाले असून ८०० जण जखमी झाले आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार ९ लाख ३१ हजार ७४ लोक या पावसामुळे विस्थापित झाले असून पूरग्रस्तांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
मान्सूनच्या पुरामुळे स्थावर मालमत्तेचेही बरेच नुकसान झाले आहे. १३ हजार घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून २२ हजार घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे, अशी माहिती प्राधिकरणाने दिली. पाकिस्तान सरकारतर्फे २४३ मदत छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत.