ऑक्सफर्डच्या तीन विद्वानांनी एका अमेरिकी कंपनीला त्यांचे मृतदेह क्रायोजेनिक पद्धतीने जतन करण्यासाठी पैसे दिले आहेत. कधीकाळी आपण परत जिवंत होऊ शकू अशी आशा त्यांना वाटते आहे. फ्युचर ऑफ ह्य़ुमॅनिटी इन्स्टिटय़ूटचे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक निक बोस्ट्रॉम व त्यांचे सह संशोधक अँडर्स सँडबर्ग यांनी एका अमेरिकी कंपनीला आगाऊ पैसे देऊन ठेवले आहेत त्या बदल्यात ही कंपनी या दोघांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची डोकी अतिशीत तापमानाला संवर्धित करून ठेवणार आहे.
त्यांचे आणखी एक सहकारी स्टुअर्ट आर्मस्ट्राँग हे आणखी एक पाऊल पुढे गेले असून त्यांनी त्यांचे पूर्ण शरीर गोठवून ठेवण्यास सांगितले आहे. संपूर्ण शरीर गोठलेल्या स्थितीत संवर्धित करून ठेवणे हे तांत्रिकदृष्टय़ा कठीण असते त्याला एक लाख तीस हजार पौंड खर्च येतो, असे द इंडिपेंडंटने म्हटले आहे. बॉस्ट्रॉम, आर्मस्ट्राँग, सँडबर्ग हे ऑक्सफर्ड मार्टिन स्कूलचा भाग असलेल्या फ्युचर ऑफ ह्य़ुमॅनिटी इन्स्टिटय़ूटचे प्रमुख संशोधक आहेत. त्यांनी जीवन विमा काढला असून दर महिना ४५ पौंडाच्या प्रीमियममधून त्यांचे मृतदेह जतन करण्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. जेव्हा त्यांना मरण जवळ आले असे वाटेल त्यावेळी क्रायोप्रिझर्वेशन पथक तयार राहील डॉक्टरांनी त्यांना मृत जाहीर केले की, हे पथक त्यांच्या मृतदेहाचा ताबा घेईल. त्यानंतर मशीनच्या मदतीने रक्ताचे पंपिंग केले जाईल व रक्तात संवर्धके तसेच रक्त न गोठवणारी रसायने सोडली जातील. जर नुसते डोके गोठवायचे असेल तर ते शरीरापासून वेगळे करावे लागेल व नंतर उणे १२४ सेल्सियस तापमानाला ते ठेवले जाईल. त्यानंतर उणे १९६ अंश सेल्सियस तापमानाला द्रव नायट्रोजनमध्ये ठेवले जाईल. सँडबर्ग यांनी संडे टाइम्सला असे सांगितले की, केवळ डोक्याच्या भागाचे संवर्धन करणे फारच मर्यादित स्वरूपाचे आहे, पण तरीही त्यातून सर्व स्मृती संगणकात साठवता येऊ शकतील. बोस्ट्रॉम व सँडबर्ग यांनी त्यांचे मृतदेह अ‍ॅरिझोनातील स्कॉटसडेल येथे अलकोर लाइफ एक्सटेंशन फाउंडेशन येथे गोठवण्यात येतील असे म्हटले आहे. या कंपनीकडे ११७ जणांचे मृतदेह गोठवण्याचे काम आहे. ३३ पाळीव प्राण्यांची शरीरेही अशीच गोठवली जाणार आहेत. ११७ जणांचे क्रायोप्रिझर्वेशन केले जाणार आहे त्यात ७७ हे मेंदू रुग्ण आहेत.