scorecardresearch

काँग्रेस कार्यकारिणीचे निम्मे सदस्य घटनेप्रमाणे निवडावेत; पी. चिदम्बरम यांची मागणी

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची एकजूट करण्यासाठी काँग्रेसला मध्यवर्ती भूमिका बजावावी लागेल असे चिदम्बरम म्हणाले.

p chidambaram
पी. चिदम्बरम

नवी दिल्ली : काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या निम्म्या सदस्यांची निवड पक्षाच्या घटनेप्रमाणे निवडणुकीच्या माध्यमातून व्हावी आणि त्यामध्ये तरुणांना अधिकाधिक संधी दिली जावी, अशी मागणी माजी अर्थमंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी केली आहे. काँग्रेस कार्यकारिणी समितीचे सदस्य निवडणाऱ्या मतदार प्रक्रियेमध्ये काही त्रुटी आहेत, त्या पक्षाच्या निवडणूक यंत्रणेने दूर कराव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच कार्यकारिणीमध्ये देशाच्या बहुविधतेचे प्रतििबब दिसावे, असे त्यांनी सुचवले.

सध्याच्या राजकीय स्थितीचे वस्तुनिष्ठ विश्लेषण केले तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची एकजूट करण्यासाठी काँग्रेसला मध्यवर्ती भूमिका बजावावी लागेल असे चिदम्बरम म्हणाले. ते सध्या पक्षाच्या सुकाणू समितीचे सदस्य आहेत. रायपूरमध्ये शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या सुकाणू समितीची बैठक होणार आहे. काँग्रेस कार्यकारिणीसाठी निवडणूक घ्यायची की नाही याचा निर्णय त्या बैठकीत घेतला जाईल. कार्यकारिणीची निवड ही सल्लामसलतीने आणि सामूहिक प्रयत्नाने केली जाईल. त्यामध्ये काही त्रुटी असल्यास त्याची जबाबदारीही सामूहिक असेल असे चिदम्बरम यांनी सांगितले. पक्षाच्या घटनेप्रमाणे कार्यकारिणीत पक्षाध्यक्ष, संसदीय पक्षाचे नेते आणि इतर २३ सदस्यांचा समावेश असतो. त्यापैकी १२ सदस्यांची निवड ही निवडणुकीमार्फत केली जाते. वास्तवात मात्र, ऑगस्ट १९९७ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर कार्यकारिणीची निवडणूक झालेली नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-02-2023 at 03:51 IST
ताज्या बातम्या