यंदाच्या वर्षी जे पद्म पुरस्कार जाहीर झाले त्यात फारसे नाव नसलेल्या पण चांगली कामगिरी असलेल्या काही व्यक्तींचा समावेश असून त्यात गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्य़ातील दिव्यांग (शारीरिक अक्षम) शेतकरी गेनाभाई पटेल (वय ५२) यांचा समावेश आहे. त्यांनी डाळिंबाच्या  शेतीच्या माध्यमातून शेतजमिनीचा सर्वोत्तम वापर केला आहे.

बनासकांठा जिल्ह्य़ातील लखानी तालुक्यातील गोलिया खेडय़ात गेनाभाई पटेल यांनी पोलिओने अपंग असतानाही शेती केली. त्यांनी शेतीच्या अनेक कार्यपद्धती शिकून घेतल्या व ठिबक सिंचनाने कोरडवाहू जमिनीत डाळिंबाचे पीक घेतले. त्या भागात पाऊसही कमी पडत आहे. त्यांच्या शेताला किमान सत्तर हजार शेतकऱ्यांनी भेट दिली आहे. त्यांची यशोगाथा ही इतरांसाठी आदर्श आहे. त्यांच्या या कार्यामुळेच त्यांना पद्मश्री किताब जाहीर झाला आहे.

गुजरातमध्ये सात जणांना पद्मश्री सन्मान मिळाला असून त्यात पटेल यांचा समावेश आहे. दिव्यांग असल्याने मी भाजीपाल्याची लागवड करू शकत नव्हतो त्यामुळे बारा वर्षांपूर्वी मी डाळिंबाची शेती करण्याचे ठरवले. त्यासाठी कृषी विद्यापीठाकडून माहिती घेतली. राज्य सरकारच्या कृषी मेळ्यांना भेटी दिल्या असे पटेल यांनी सांगितले. त्यांनी डाळिंबाची रोपे महाराष्ट्रातून नेली होती व ती २० हेक्टर जागेत लावली, त्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला. दोन वर्षांनी डाळिंबे लागली. त्याला चांगला भाव मिळत नव्हता कारण बाजारपेठ माहिती नव्हती. लागवडीनंतर चार-पाच वर्षांनी डाळिंबांना चांगला भाव मिळू लागला असे ते सांगतात. यातून अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली. दोन वर्षांत संपूर्ण खेडय़ात डाळिंबाची लागवड झाली.

राजस्थानच्या सीमेवरही डाळिंबाची लागवड सुरू झाली. किमान ७० हजार शेतकऱ्यांनी माझ्या डाळिंबाच्या बागेस भेट दिली आहे, असे ते अभिमानाने सांगतात. कर्नाटक, आंध्र प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र या राज्यांतून शेतकरी डाळिंब खरेदीसाठी डिसेंबर ते जानेवारीदरम्यान येतात.

गेनाभाई यांना गुजरात व राजस्थानात अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सृष्टी सम्मान मिळाला होता. २०१३ मध्ये त्यांनी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेत व्याख्यान दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची नऊ वेळा भेट झाली. अलीकडेच बनासकांठा येथील दिशा येथे मोदी यांच्याशी त्यांची भेट झाली होती. त्यावेळी मोदी यांनी पटेल यांच्या कार्याची प्रशंसा केली होती.