शरद पवार यांना पद्मविभूषण’; सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यासह राजकारण्यांचाही सन्मान

‘शरद पवार यांचे बोट धरून मी राजकारणात आलो’, असे जाहीरपणे सांगणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार यांच्यासह इतर काही राजकीय गुरूंना, आध्यात्मिक गुरूंना मोठी गुरुदक्षिणा दिली आहे. देशातील नागरी पुरस्कारांत ‘भारतरत्न’पाठोपाठचे स्थान असलेला ‘पद्मविभूषण’ पुरस्कार शरद पवार यांना जाहीर झाला असून, सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे ठाम समर्थन करणारे व ‘सरकार उत्तम काम करते आहे’, असे प्रशस्तिपत्रक देणारे सद्गुरू जग्गी वासुदेव यांनाही हा सन्मान घोषित झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांचाही ‘पद्मविभूषण’ने सन्मान करण्यात आला असून, दिवंगत सुंदरलाल पटवा व दिवंगत पी. ए. संगमा हे राजकारणातील कसबी खेळाडूही या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

विविध क्षेत्रांत प्रशंसनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या ‘पद्म’ पुरस्कारांची घोषणा प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला, बुधवारी केंद्र सरकारने केली. ‘पद्म’पुरस्कारांतील श्रेष्ठ अशा ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सात मान्यवरांना गौरवण्यात आले आहे. त्यात चार राजकारणी आहेत. केंद्रात मोदी यांचे सरकार आल्यानंतर मोदी यांच्या कामाची अनेकदा स्तुती करणारे, कधी त्यांच्यावर टीका करणारे, मात्र त्यांच्याशी उत्तम संबंध राखणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ‘पद्मविभूषण’ने गौरविण्यात आले आहे. मुरली मनोहर जोशी, पी. ए. संगमा (मरणोत्तर), सुंदरलाल पटवा (मरणोत्तर) हे राजकारणी या गौरवाचे मानकरी आहेत. त्याखेरीज प्रख्यात गायक येसूदास (कला-संगीत), सद्गुरू जग्गी वासुदेव आणि रत्नसुंदर महाराज (अध्यात्म), प्रा. उडिपी रामचंद्र राव (विज्ञान व अभियांत्रिकी) हे मान्यवरही ‘पद्मविभूषण’चे मानकरी ठरले आहेत.