Pahalgam Terror Attack Updates: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये २६ निष्पाप नागरिकांची हत्या करणारे पाकिस्तानस्थित दहशतवादी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील त्यांच्या सूत्रांच्या सतत संपर्कात होते. त्यांनी बेताब खोऱ्यात शस्त्रे लपवून ठेवली होती, असे राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) प्राथमिक तपासात आढळून आले आहे. २२ एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये बहुतेक पर्यटक होते.
एनआयएने त्यांच्या प्राथमिक तपासात पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या नियोजनात आणि अंमलबजावणीत पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा, इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय) आणि पाकिस्तानी लष्करातील घटकांचा सहभाग असल्याचे ठोस पुरावे उघड केले आहेत. याबाबत टाइम्स नाऊने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.
पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेला हाशिम मुसा (ज्याला सुलेमान किंवा सुलेमान म्हणूनही ओळखले जाते), हा पाकिस्तानी सैन्याच्या विशेष दलांचा माजी पॅरा कमांडो असल्याचे मानले जाते. एलईटीची शाखा असलेल्या रेझिस्टन्स फोर्सने सुरुवातीला पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. पण, जागतिक दबाव वाढल्याने या गटाने आपला सहभाग नाकारला होता.
एनआयएच्या तपासात असे आढळून आले आहे की, या भयानक हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी बेताब खोऱ्यात त्यांची शस्त्रे लपवली होती, असे सूत्रांनी टाइम्स नाऊला सांगितले आहे. यासाठी त्यांना ओव्हरग्राउंड वर्कर्सकडून मदत मिळाली होती. ओव्हरग्राउंड वर्कर्सनी दहशतवाद्यांना स्थानिक पातळीवर महत्त्वाची माहिती पुरवल्याचा आरोप आहे. एनआयएच्या सूत्रांनुसार, दहशतवादी अजूनही दक्षिण काश्मीरच्या जंगलात लपले असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, एनआयएने २७ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा खटला हाती घेतला होता आणि एनआयए प्रमुख सदानंद दाते यांनी बैसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणाची पाहणी केली होती. एजन्सीने पुराव्यांचा शोध देखील तीव्र केला आहे आणि दहशतवादी कट उलगडण्यासाठी अनेक प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली जात आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पाऊले चरण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून भारताने सिंधू जल करार स्थगित गेला आहे. तसेच भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याची आदेश दिले आहेत. भारताच्या या निर्णयानंतर पाकिस्ताननेही त्यांची हवाई हद्द भारतासाठी बंद केली आहे. याचबरोबर हजारे भारतीय नागरिक पाकिस्तानातून मायदेशात परतले आहे.