पाकिस्तानी सैन्याने तालिबान्यांविरोधातील कारवाई अधिक तीव्र केल्याच्या पाश्र्वभूमीवर देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा चोख बंदोबस्त करू, असे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल राहील शरिफ यांनी गुरुवारी सांगितले.
पाकिस्तानी लष्कराचा कोत्री, सिंध येथे लष्करी सराव सुरू असून तेथे भेट दिल्यानंतर शरिफ यांनी पाकिस्तानी सैन्य सर्व प्रकारच्या धोक्यांचा सामना करण्यास तयार असल्याचे नमूद केल्याचे लष्करातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. या लष्करी सरावात पाकिस्तानी हवाई दलाच्या लढाऊ विमाने, लढाऊ वाहनांनीही सहभाग घेतला. देशाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या लष्करी विभागांना विविध परिस्थितीशी जुळवून घेता यावे यासाठी या लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आल्याचे शरिफ यांनी सांगितले.
दरम्यान, पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तानला लागून असलेल्या आदिवासी भागात गेल्या आठवडय़ापासून सुरू केलेल्या हवाई हल्ल्यात आतापर्यंत सुमारे १०० दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या निवासस्थानी नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी लष्करप्रमुख शरिफ यांच्याकडून तालिबान्यांचे प्राबल्य असलेल्या उत्तर वझिरिस्तान तसेच खैबर भागात केलेल्या यशस्वी धडक लष्करी कारवाईबाबत माहिती जाणून घेतल्याचे वृत्त स्थानिक वृत्तपत्रांनी म्हटले आहे.