पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवझ मुशर्रफ यांच्याविरुद्ध देशद्रोहाच्या खटल्याची सुनावणी सुरू असून शुक्रवारी ते न्यायालयात हजर न राहिल्याने त्यांच्याविरुद्ध सशर्त अजामीनपात्र अटक वॉरण्ट जारी करण्यात आले आहे. मुशर्रफ न्यायालयासमोर हजर झाले नाहीत तर या वॉरण्टची ३१ मार्च रोजी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे विशेष न्यायालयाचे रजिस्ट्रार अब्दुल गनी सुमरू यांनी सांगितले. या आदेशाची प्रत मिळाल्यावर त्याला आव्हान देण्यात येईल, असे बचाव पक्षाच्या वकिलांनी स्पष्ट केले.सुरक्षेच्या कारणास्तव मुशर्रफ न्यायालयात हजर राहू शकत नसल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले. मुशर्रफ यांना शुक्रवारी न्यायालयात पाचारण करण्यात आले होते. मात्र त्यांचे वकील अन्वर मन्सूर यांनी, मुशर्रफ यांना न्यायालयात हजर न राहण्याची सवलत द्यावी, असा विनंती अर्ज केला.