जगात सर्वत्र शांतता नांदावी आणि पाकिस्तानची भरभराट व्हावी, अशी सदिच्छा पाकिस्तानचे पंतप्रधान रझा परवेज अश्रफ यांनी शनिवारी व्यक्त केली. येथील प्रसिद्ध ख्वाजा मोइनुद्दीन चिश्तीच्या दग्र्यात माथा टेकल्यानंतर संदेश-वहीमध्ये त्यांनी ही भावना व्यक्त केली. अश्रफ यांच्या या भेटीचा अनेकांनी निषेध केला तसेच ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणाही दिल्या.
या दग्र्याचे मौलवी तसेच स्थानिक वकील, व्यापारी व संघटनांनी अश्रफ यांच्या अजमेर दौऱ्याला विरोध दर्शविला होता. भाजपचे कार्यकर्तेही तेथे मोठय़ा प्रमाणावर गोळा झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तरीही या आंदोलकांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला होता. याच वातावरणात अश्रफ यांनी सपत्निक व सहकुटुंब या दग्र्याला भेट दिली. त्यांच्या ताफ्यात तब्बल वीसपेक्षा अधिक नातेवाईकांचा समावेश होता. या सर्वानी तेथे अर्धा तास व्यतीत केला. मला आणि माझ्या कुटुंबीयांना येथे माथा टेकता आल्याने आम्ही स्वत:ला सुदैवी मानतो, जगात सर्वत्र शांतता नांदावी व पाकिस्तानची भरभराट व्हावी, अशी आपली इच्छा असल्याचा संदेश त्यांनी दिला.

जयपूर : परराष्ट्र व्यवहारमंत्री सलमान खुर्शीद यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान रझा अश्रफ यांच्या सन्मानार्थ खास भोजनाचे आयोजन केले होते. मात्र त्यांच्यासमवेत दहशतवादाच्या मुद्दय़ावर कोणतीही चर्चा केली नाही. अश्रफ यांची ही खासगी भेट असून ते यात्रेकरू म्हणून आले आहेत. त्यामुळे या वेळी त्यांच्याशी दहशतवादाबाबत चर्चा करणे योग्य नाही आणि आपल्याला तो अधिकारही नाही, असे खुर्शीद यांनी स्पष्ट केले.

४२ मीटर लांबीची चादर!
अश्रफ यांनी या दग्र्यात तब्बल ४२ मीटर लांबीची रंगीबेरंगी मखमली चादर चढवली. मोठय़ा प्रमाणावर आणलेली विविधरंगी फुलेही त्यांनी येथे अर्पण केली. त्यांच्या या चादरीची उपस्थितांमध्ये चर्चा रंगली होती.