पाकिस्तानातील मानवाधिकार कार्यकर्त्यांची मागणी
स्वातंत्र्य संग्राम सैनिक भगतसिंह यांना १९३१ साली फाशी दिल्याबद्दल ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांनी माफी मागावी, तसेच त्यांच्या मृत्यूबद्दल त्यांच्या वारसांना भरपाई द्यावी, अशी मागणी पाकिस्तानातील मानवाधिकार कार्यकर्त्यांनी शहीद भगतसिंग यांच्या ८५व्या पुण्यतिथीच्या दिवशी केली.
भगतसिंग यांच्या पुण्यतिथीनिमित्त पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात बुधवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यापैकी पहिला कार्यक्रम भगतसिंग यांच्या जन्मस्थळी, म्हणजे लाहोरपासून १०० किलोमीटर अंतरावरील चक १०५-जीबी, बंग चाक, जरानवाला, जिल्हा फैसलाबाद येथे झाला.
दुसरा कार्यक्रम लाहोरमधील शादमान चौक येथे झाला. सरकारविरुद्ध कट रचल्याचा खटला चालवून भगतसिंग यांना याच ठिकाणी राजगुरू व सुखदेव या सहकाऱ्यांसह २३ मार्च १९३१ रोजी फाशी देण्यात आली होती.
स्वातंत्र्य लढय़ातील या वीराला फासावर चढवल्याबद्दल ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी माफी मागावी, त्याचप्रमाणे या अन्यायकारक मृत्यूबद्दल त्यांच्या वारसांना भरपाई द्यावी अशी मागणी करणारा ठराव यावेळी संमत करण्यात आला. भगतसिंग यांना आधी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती, परंतु नंतर एका ‘बनावट प्रकरणात’ त्यांना फाशी ठोठावण्यात आली, असे या ठरावात म्हटले आहे.
भारतीय राजदूत गौतम बंबवाले यांचा लेखी संदेशही या वेळी वाचून दाखवण्यात आला.