गेल्या जूनमध्ये कराची विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागील ‘मास्टर माइंड’च्या यादीत प्रमुख सूत्रधार म्हणून ‘तहरीक ए तालिबान पाकिस्तान’च्या (टीटीपी) म्होरक्याच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. ‘टीटीपी’च्या सहा दहशतवाद्यांचीही नावे या यादीत आहेत. पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयाचे न्यायाधीश बशीर अहमद खोसो यांनी शनिवारी ‘टीटीपी’च्या फरारी दहशतवाद्यांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले. येत्या ८ जानेवारीपर्यंत दहशतवाद्यांना न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश तपास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. विमानतळ हल्ल्यासंदर्भातील चौकशी अहवाल न्यायालयासमोर सादर केल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला.
हल्ला करण्यासाठी दहा जणांना प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यांना शस्त्रास्त्रे आणि आर्थिक मदत पुरवण्याच्या कामात मदत करणाऱ्या सर्माद सिद्दिकी, असिफ झहीर आणि नदीम ऊर्फ बर्जर ऊर्फ मुल्ला यांना पोलिसांनी याआधीच अटक केली आहे.
विमानतळावरील हल्ल्यात २६ जणांचा बळी गेला होता. त्यानंतर पोलीस कारवाईत १० दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. पेशावर येथील लष्करी शाळेतील १३३ मुलांच्या निघृण हत्येनंतर पाकिस्तानात तालिबानविरोधातील मोहीम तीव्र करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुक्रवारी अतिरेक्यांच्या तळावर पाकिस्तानी लष्करातर्फे हल्लेही चढविण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Dec 2014 रोजी प्रकाशित
कराची विमानतळ हल्ल्यामागे ‘तहरीक ए तालिबान पाकिस्तान’चा म्होरक्या
गेल्या जूनमध्ये कराची विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागील ‘मास्टर माइंड’च्या यादीत प्रमुख सूत्रधार म्हणून ‘तहरीक ए तालिबान पाकिस्तान’च्या (टीटीपी) म्होरक्याच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.
First published on: 22-12-2014 at 01:29 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak tehrik e taliban chief among main accused in karachi airport attack