भारतीय सैन्याने गुरूवारी सीमारेषेच्या परिसरात शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. भारताच्या या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. याशिवाय, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झकारिया यांनीदेखील ट्विट करून भारताने तंदर, सब्झकोट, खुईर्ता, बरोन, बागसार आणि खंजर या सीमारेषेलगतच्या परिसरात हल्ला केल्याचे म्हटले आहे.

तसेच ‘डॉन’ न्यूजच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या कोटली शहरातील पोलीस अधिकाऱ्याने हल्ल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. यावेळी भारताकडून करण्यात आलेल्या उखळी तोफांच्या माऱ्यामुळे सब्जकोट गावातील घराचे छत कोसळले. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोनजण जखमी झाले आहेत. याशिवाय, कोटली गावातील ७५ वर्षांची वृद्ध महिलाही भारतीय सैन्याच्या हल्ल्यात जखमी झाली आहे. काल रात्रीपासून भारताकडून या परिसरात उखळी तोफांचा जोरदार मारा करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, नौशेरा सेक्टरमध्येही पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे दोन सैनिक जखमी झाले आहेत. दरम्यान, पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एका भारतीय महिलेचा मृत्यू झाला, तर त्या महिलेचा पती गोळीबारात जखमी झाला. पाकिस्तानकडून आज (गुरुवारी) नौशेरामध्ये उखळी तोफांच्या मदतीने हल्ला करण्यात आला. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात अख्तर बी (वय ३५) यांचा मृत्यू झाला. अख्तर बी यांचे पती मोहम्मद हनिफ (वय ४०) पाकिस्तानच्या हल्ल्यात जखमी झाले.

पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एका भारतीय महिलेचा मृत्यू झाला, तर त्या महिलेचा पती गोळीबारात जखमी झाला. पाकिस्तानकडून आज (गुरुवारी) नौशेरामध्ये उखळी तोफांच्या मदतीने हल्ला करण्यात आला. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात अख्तर बी (वय ३५) यांचा मृत्यू झाला. अख्तर बी यांचे पती मोहम्मद हनिफ (वय ४०) पाकिस्तानच्या हल्ल्यात जखमी झाले.