‘पाकिस्तान लष्कर अल्पसंख्यांकांची हत्या करण्यासाठी जिहादींचा वापर करतंय’

जिहादींच्या मदतीने अल्पसंख्यांक आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ले घडवून आणले जात आहेत

पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा (संग्रहित छायाचित्र)
अल्पसंख्यांकांची हत्या करण्यासाठी पाकिस्तान लष्कराने जिहादी संघटनांसोबत हातमिळवणी केली असल्याचा आरोप वॉशिंग्टनमधील पाकिस्तानी सामाजिक कार्यकर्ता नदीम नुसरत यांनी केला आहे. गेल्या काही दशकांमध्ये पाकिस्तान लष्करात कट्टरता वाढली असून लष्कराने जिहादींच्या मदतीने अल्पसंख्यांक आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ले घडवून आणले आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.

फ्री कराची मोहिमेचे प्रवक्ता नदीम नुसरत यांनी म्हटलं आहे की, ‘भारतासोबत पाकिस्तान लष्कराचे संबंध चांगले राहिलेले नाहीत. अशा परिस्थितीत भविष्यात भारत आणि पाकिस्तानधील संबंध सुधारले तर लष्कराला आपलं अस्तित्व राखण्यासाठी संघर्ष करावा लागेल’. ‘जर पाकिस्तान लष्कर राजकारणात मध्यस्थी करत राहिला तर दोन्ही देशात कधीच तडजोड होणार नाही’, असंही ते बोलले आहेत.

‘अन्य देशांमध्ये सरकार योजना बनवतं आणि सर्वजण त्याचं पालन करतं. पण पाकिस्तानमध्ये याउलट लष्करच देशाचा कायदा ठरवतो’, असं नदीम नुसरत बोलले आहेत. ‘पाकिस्तान लष्कर, गुप्तचर यंत्रणा आणि आयएसआय धार्मिक दहशतवाद आणि कट्टरतावादाला खतपाणी देत आहे. पाकिस्तानी जमिनीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जात आहे. येथेच दहशतवादी हल्ल्यांचा कट आखला जातो आणि तो पुर्णत्वास नेला जातो’, असा आरोप त्यांनी केला आहे.

‘पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकासाठी योग्य परिस्थिती नसून, येथे सर्वच धर्मातील लोकांना त्रास होत आहे. जोपर्यंत सिस्टीममध्ये बदल होत नाही तोपर्यंत सकारात्मक बदल होणार नाहीत’, असं नदीम नुसरत यांनी सांगितलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pakistan army using jihadis to kill minorities