पाकिस्तान म्हणजे दहशतवादाचा आश्रयदाता आहे, तालिबान, हक्कानी नेटवर्क आणि लष्कर- ए-तोयबा यांसारख्या दहशतवादी संघटना तयार करून भारताची शक्ती पोखरण्याचं काम पाकिस्ताननं केलं आहे असं आता अमेरिकेनं म्हटलं आहे. पाकिस्तान हे दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थळ असून पाकनं कायम दहशतवादाविरोधात लढाईचं कारण पुढे करत अमेरिकेकडून शस्त्र आणि आर्थिक रसद घेतली आहे. पाकिस्तानचं हे धोरण अत्यंत चुकीचं आहे अशी टीका अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी केली आहे.
अमेरिकेनं उत्तर कोरियाबाबत दुराग्रही धोरण स्वीकारलं आहे, अगदी असंच धोरण पाकिस्तानविरोधातही घेण्यास अमेरिकेनं सुरूवात केली पाहिजे असं मत रिपब्लिकन पक्षाच्या माजी सेनेटरनी मांडलं आहे. अमेरिकेनं पाकिस्तानसारख्या कट्टरपंथी देशासोबत संबंध तोडून भारतासारख्या सहिष्णू देशासोबत संबंध अधिकाधिक दृढ करायला हवेत असंही त्यांनी म्हटलं आहे. माजी सेनेटर लेरी प्रेसलर यांनी नेबर्स इन आर्म्स या पुस्तकात पाकिस्तानच्या धोरणाबाबत कडाडून टीका केली आहे.
दहशतवादाला खतपाणी घालण्याचं धोरण जर पाकिस्ताननं सोडलं नाही तर या देशाला दहशतवादी देश जाहीर करून कायमचा बहिष्कार घातला पाहिजे. माझ्याशिवाय अमेरिकेतल्या इतर अभ्यासकांनाही पाकिस्तानचं धोरण मुळीच पसंत नाही. पाकिस्तानला अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत मिळते ती थांबवली गेलीच पाहिजे आणि या अपयशी देशावर बहिष्कार घातला पाहिजे असंही प्रेसलर यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे.
पाकिस्तानची भूमिका दहशतवादाला खतपाणी घालणारी आहे हे आजवर अनेकदा सिद्ध झालं आहे. असं असूनही पाकिस्तानच्या कुरापती काढणं काही संपत नाहीये. आता दहशतवाद हा मुद्दा पुढे आणून अमेरिकेनं पाकिस्तानला उघडं पाडायला सुरूवात केली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.