लष्कराने ठणकावले

जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्य़ांतील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने केलेल्या तोफांच्या माऱ्यांत भारतीय लष्करातील कॅप्टन दर्जाच्या अधिकाऱ्यासह तीन जवान शहीद झाले, पाकिस्तानच्या या आगळिकीला सडेतोड प्रत्युत्तर देण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत सोमवारी भारतीय लष्कराने दिले. भारतीय लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरातूनच त्याची प्रचिती येईल, असेही लष्कराने पाकिस्तानला ठणकावले आहे. पाकिस्तानकडून सातत्याने होत असलेल्या आगळिकीला भारतीय लष्कर सडेतोड प्रत्युत्तर देत असून अशा प्रकारच्या कृत्यांना यापुढेही असाच प्रतिसाद कायम राहील, असे लेफ्ट. जन. शरद चंद यांनी स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानला यापुढे प्रत्युत्तर दिलेच जाणार आहे,वास्तविक हे स्पष्ट करण्याची आपल्याला गरजच वाटत नाही, आमच्या कृतीमधूनच त्याची प्रचिती येईल, असेही ते म्हणाले. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यास पाकिस्तानचे लष्कर सहकार्य करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आणि त्यालाही सडेतोड प्रत्युत्तर देण्यात येईल असे सांगितले.

हल्ले सुरूच

शस्त्रसंधीच्या उल्लंघन करत पाककडून हल्ले सुरूच आहेत. राजौरी जिल्ह्य़ांत आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून तोफांचा मारा सुरू आहे.या हल्ल्यांत एक उपनिरीक्षक जखमी झाला.

रविवारी झालेल्ल्या हल्ल्यात चार जवान शहीद झाले त्यात कॅप्टनचाही समावेश आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यांत झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पथके पाठविण्यात आली असून तीन दिवसांसाठी या परिसरातील ८४ शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पाकचे रडगाणे

इस्लामाबाद काश्मीर प्रश्न सोडवल्याशिवाय प्रादेशिक विकास होणे अवघड असून या भागातील शांतता व भरभराटही होणे कठीण आहे, त्यामुळे  काश्मीरमधील लोकांच्या स्वयंनिर्णयाच्या लढय़ास आमचा पाठिंबा आहे, असे पाकिस्तानने म्हटले आहे. काश्मीर दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात  पाकिस्तानचे अध्यक्ष ममनून हुसेन यांनी व पंतप्रधान शाहीद खाकन अब्बासी यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमात काश्मीरचा मुद्दा उपस्थित करून नेहमीप्रमाणे रडगाणे गायिले आहे.

लष्करावर पूर्ण विश्वास – राजनाथसिंह

भारतीयांना आपल्या देशाच्या लष्कराच्या शौर्यावर पूर्ण विश्वास आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी संसदेबाहेर वार्ताहरांना सांगितले. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने कोणती पावले उचलली आहेत, असे विचारले असता गृहमंत्र्यांनी वरील उत्तर दिले.

चर्चेला सुरू करा जम्मू-काश्मीर सरकार

पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचे तीव्र पडसाद सोमवारी जम्मू-काश्मीर विधानसभेत उमटले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शांतता आणि समझोता प्रक्रिया चर्चेला पुन्हा सुरुवात करण्याचा आग्रही मागणी राज्य सरकारने केली. मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती सरकारने घेतलेल्या या भूमिकेला विरोधी पक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सने पाठिंबा दिला. त्यापूर्वी पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा निषेध करणारा ठराव करावा अशी मागणी भाजपचे आमदार रविंदर रैना यांनी केली. शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या प्रश्नावरून सभागृह तहकूब झाले.

यंदा वाढदिवस झाला नाही!

पाक हल्ल्यात शहीद झालेले कॅप्टन कपिल कुंडू यांचा १० फेब्रुवारीला वाढदिवस होता. त्यानिमित्त ते घरी येणार होते. अचानक घरी येऊन ते आश्चर्याचा सुखद धक्का देत असत. गेल्या नोव्हेंबर महिन्यांत ते घरी आले होते. कसेबसे आपले अश्रू आवरत कुंडू यांच्या आई सुनीता सांगत होत्या.हरयाणाच्या गुरगांव जिल्ह्य़ातील पतौडीनजीकच्या रंसिका गावावर शोककळा पसरली.

आर्थिक मार्गिकेवर भारताकडून हल्ल्याची भीती

चीन—पाकिस्तान आर्थिक मार्गिकेवरील आस्थापनांवर भारत हल्ले करण्याची शक्यता पाकिस्तानला वाटत असून, त्या देशाने सुरक्षा तयारी सुरू केली असल्याचे डॉन या वृत्तपत्राने म्हटले आहे. पाकिस्तान सरकारने या बाबत गिलगिट बाल्टिस्तानच्या गृह खात्याला या बाबत पत्र पाठवले आहे. डॉनने म्हटले आहे, की पाकिस्तान-चीन आर्थिक मार्गिकेवर हल्ला होण्याची शक्यता देशाच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने वर्तवली आहे. पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने पाठवलेल्या पत्रात म्हटल्यानुसार भारताने ४०० मुस्लिम युवकांना प्रशिक्षणासाठी अफगाणिस्तानात पाठवले असून, त्यानंतर पाकिस्तान—चीन आर्थिक मार्गिकेवर हल्ला केला जाणार आहे. काराकोरम महामार्गासह काही मोक्याच्या ठिकाणी भारत हे हल्ले करणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.