भारत आणि चीनदरम्यान सुरू असलेल्या सीमावादापासून लक्ष विचलित करण्यासाठी भारत पाकिस्तानवर हल्ला करण्याचा कट रचत असल्याचा गंभीर आरोप पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी केला. दरम्यान, यापूर्वी नवी दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्चायोगातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करण्यास भारतानं सांगितलं होतं.

भारत आणि चीन यांच्या वादावरून लक्ष विचलित करत पाकिस्तानवर लक्ष केंद्रित करण्याचा भारताचा प्रयत्न सुरू असल्याचंही कुरेशी म्हणाले. पाकिस्तानमधील ‘जियो पाकिस्तान’ या वाहिनीवर चर्चा करताना त्यांनी हा आरोप केला. भारत हा पाकिस्तानविरोधात ‘फॉल्स फ्लॅग ऑपरेशन’ सुरू करण्याची संधी शोधत असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, त्यांनी आरोप केले असले तरी त्याबाबत कोणतीही अधिक माहितीही दिली नाही किंवा कोणते पुरावेही सादर केले नाही. तसंच यावेळी त्यांनी चीन आणि भारतीय जवानांमध्ये झालेल्या चकमकीत २० जवानांना हौतात्म्य आलं त्याचाही उल्लेख केला. “भारतात विरोधी पक्ष यावर प्रश्न उपस्थित करत आहे परंतु केंद्र सरकार त्यावर कोणतंही उत्तर देत नाही,” असंही कुरेशी यांनी बोलताना नमूद केलं.

भारताला इशारा

“जर कोणीही पाकिस्तावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर पाकिस्तानही पूर्ण ताकदीनीशी त्याचा सामना करेल,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसंच हेरगिरीच्या आरोपाबाबत बोलताना त्यांनी भारतानं केलेल्या आरोपांचं खंडनही केलं. “भारतात पाकिस्तानी कर्मचाऱ्यांना त्रास दिला गेला आणि अधिकाऱ्यांद्वारे त्यांचा पाठलागही केला गेला,” असा आरोप कुरेशी यांनी यावेळी केला. दरम्यान, इस्लामाबादमधील भारताच्या प्रभारींनाही मंगळवारी याबाबत माहिती देण्यात आली असून भारतीय कर्मचाऱ्यांनाही अशीच वागणूक देण्यात येईल असं त्यांना सांगितल्याचंही ते म्हणाले.