पाकिस्तानात लष्करप्रमुखांवर टीका करणे पडले महागात; मेजर जनरलच्या मुलाला पाच वर्षांची शिक्षा

लाहोर उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर मेजर जनरलच्या मुलाला शिक्षा करण्यात आल्याची माहिती समोर आली

Pakistan former major general son jailed for criticized extension of army chief bajwa tenure
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्या विरोधात पत्र लिहिल्याबद्दल आणि ते वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना पाठवल्याबद्दल पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने माजी मेजर जनरलच्या मुलाला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.  हसन अस्करी या संगणक अभियंत्याने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लिहिलेल्या पत्रात जनरल बाजवा यांच्या लष्करप्रमुखपदाच्या कार्यकाळाच्या मुदतवाढीवर आणि त्यांच्या धोरणांवर टीका केली होती आणि त्यांना पायउतार होण्यास सांगितले होते.

अस्करी यांनी त्यांच्या पत्राच्या प्रती विविध मेजर जनरल आणि लेफ्टनंट जनरलना पाठवल्या होत्या. त्याचे वडील जफर महदी अस्करी यांनी पाकिस्तानी लष्करात जनरल म्हणून काम केले आहे.

अस्करी यांच्यावर लष्करी अधिकार्‍यांना सर्वोच्च कमांडच्या विरोधात भडकवल्याचा आरोप करण्यात आला होता. जुलैमध्ये त्याला फील्ड जनरल कोर्ट मार्शलने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. गुजरनवाला छावणी येथे त्यांच्या खटल्याची सुनावणी झाली आणि दोषी ठरल्यानंतर त्याला साहिवाल येथील उच्च सुरक्षा तुरुंगात पाठवण्यात आले.

जनरल बाजवा यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे, अशी मागणी हसन यांनी एका पत्राद्वारे केली होती. तसेच त्यांनी तातडीने पद सोडावे नाहीतर यामुळे लष्करात चुकीचा संदेश जाईल आणि चुकीची परंपरा प्रस्थापित होईल, असे हसन म्हणाले होते.

पाकिस्तानी लष्कर किंवा इतर विभागांनी लष्करी अधिकारी आणि त्यांच्या मुलाविरुद्धच्या खटल्याबाबत कोणतीही माहिती दिलेले नव्हती. यासंदर्भात लाहोर हायकोर्टात याचिका दाखल केल्यावर ही बाब समोर आली. हसनचे वडील जफर मेहदी अस्करी हे स्वतः पाकिस्तानी लष्करात जनरल राहिले आहेत. त्याच्या मदतीने हसनने या पत्राची प्रत लष्करातील काही सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांना पाठवल्याचा आरोप आहे.

लाहोर उच्च न्यायालयाच्या रावळपिंडी खंडपीठात हसन अस्करींच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर या प्रकरणाबद्दलची माहिती नुकतीच समोर आली आहे. या शिक्षेला आव्हान देणार्‍या याचिकाकर्त्याने आरोप केला आहे की, खटल्याच्या सुनावणीदरम्यान आपल्या मुलाला त्याच्या पसंतीचा वकील दिला गेला नाही. तसेच त्यांना रावळपिंडी येथील अदियाला तुरुंगात हलवण्याची विनंतीही त्यांनी केली.

अलीकडेच इम्रान खान सरकारने बाजवा यांच्या खास नदीम अंजुम यांच्या आयएसआय प्रमुखपदाटच्या नियुक्तीला हिरवा कंदील दिला आहे. असे असूनही संकट संपलेले नसून पाकिस्तान राजकीय अस्थिरतेकडे वाटचाल करत असल्याचे दिसत आहे. बाजवा यांच्या निवडीला अनेक दिवस विरोध केल्यानंतर इम्रान खान यांनी मंगळवारी लेफ्टनंट जनरल नदीम अहमद अंजुम यांची या पदावर नियुक्ती करण्यास सहमती दर्शवली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pakistan former major general son jailed for criticized extension of army chief bajwa tenure abn

ताज्या बातम्या