भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाने आज पाकिस्तानाला काश्मीर मुद्यावरील त्यांच्या बेताल वागणुकीवरून चांगलेच धारेवर धरले. परराष्ट्र मंत्रालयाने काश्मीर मुद्यावरून पाकिस्तानच्या मंत्र्याकडून यूएनला लिहिलेल्या पत्रापासून ते त्यांच्या मंत्र्यांकडून रोज केल्या जाणाऱ्या बेताल वक्तव्य व क्षेपणास्त्र चाचणीपर्यंत पाकिस्तानचा समाचार घेतला. तर, पाकिस्तान भारताता हिंसा भडकवण्याचे काम करत आहे, पाकिस्तानने एका सामान्य शेजाऱ्याप्रमाणे वागावं असेही परारष्ट्र मंत्रालयाकडून सुनावण्यात आले आहे.

भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी म्हटले की, आम्ही भारताच्या अंतर्गत प्रकरणावर पाकिस्तानच्या नेतृत्वाकडून अशातच केल्या गेलेल्या वक्तव्यांचा निषेध करतो. पाकिस्तानचे मंत्री शिरीन मजारी यांनी संयुक्त राष्ट्राकडे काश्मीर मुद्यावरून पाठवलेल्या पत्राबाबत रवीश कुमार यांनी सांगितले की, या पत्राचे महत्व ज्यावर हा मजकूर लिहिलेला आहे त्या कागदापेक्षाही कमी आहे, यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊन मी त्याचे महत्व वाढवू इच्छित नाही.

काश्मीर मुद्यावर पाकिस्तानने घेतलेल्या भूमिकेवरून परराष्ट्र मंत्रालयाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी रवीश कुमार यांनी सांगितले की, पाकिस्तान हिंसा पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचे हे वागणे बेजबाबदारपणाचे आहे, काश्मीर आमचा अंतर्गत मुद्दा आहे. तर त्यांच्या क्षेपणास्त्र परीक्षणाबाबत आम्हाला संपूर्ण माहिती असल्याचेही ते यावेळी म्हणाले.आम्हाला माहिती आहे की नेहमी जेव्हा आम्ही पाकिस्तानाला आपल्या चिंता दर्शवतो तेव्हा ते दहशतावादाचा वापर करतात. आताही पाकिस्तान भारतात दहशतवादी पाठवण्याच्या तयारीत आहे. मात्र आम्ही हे पाकिस्तानाला सांगू इच्छितो की त्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या जमीनवरून पसरणाऱ्या दहशतवादाविरूद्ध कारवाई करावी.

जम्मू-काश्मीरमधील कोणत्याही रूग्णालयातून औषधी किंवा अन्य कोणतीही वस्तू नसल्याची तक्रार आलेली नाही. एकही गोळी चाललेली नाही, एकालाही जीव गमावावा लागलेला नाही. शेवटच्या स्तरापर्यंत हळूहळू सकारात्मक बदल होत आहेत, असेही ते म्हणाले.