पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेच्या एका एजंटसह चार दहशतवादी भारतात शिरल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर गुजरात आणि राजस्थान या दोन राज्यांसह संपूर्ण देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, हे दशतवादी अफगाणिस्तानचा पासपोर्ट वापरून भारतात शिरल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आयएसआयच्या एका एजंटसह चार दहशतवादी भारतीय सीमेत घुसले असल्याचे राजस्थानचे पोलीस अधीक्षक कल्याणमल मीणा यांनी सांगितलं. तसेच कोणत्याही क्षणी ते घातपात घडवू शकतात, असंही त्यांनी नमूद केलं. यासंबंधी एक पत्र जिल्ह्यातील सर्व पोलीस स्थानकांना पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, पत्र मिळाल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तसेच सर्वाधिक वर्दळीची ठिकाणं, हॉटेल्स, रेल्वे स्थानकं आणि बस स्थानकांमध्ये सखोल तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त संशयित वाहनं आणि संशयित व्यक्तींवरही नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.


यापूर्वी 9 ऑगस्ट रोजी गुप्तचर यंत्रणांनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवत हाय अलर्ट जारी केला होता. तसेच पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेमार्फत समर्थन मिळणारे दहशतवाद्यांचे गट जम्मू काश्मीर आणि अन्य ठिकाणी दहशतवादी कारवाया करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. तसेच सर्वच स्तरावर तोंडावर पडल्यानंतर आता पाकिस्तान एकाकी पडला आहे. कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याच्या घटना घडल्या होत्या. भारताच्या स्वातंत्र्यदिनीही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. तसेच पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी भारताकडून देण्यात आलेली मिठाईदेखील त्यांनी स्वीकारली नव्हती.