जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करुन जम्मू काश्मीरचे विभाजन करण्याचा भारत सरकारने निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तान चांगलाच संतापला आहे. मात्र या निर्णयाचा भारताना पुन:विचार करावा म्हणून अनेक व्यासपीठांवरुन भारतावर दबाव निर्माण करण्याचा पाकिस्तानचे सगळे प्रयत्न व्यर्थ गेले आहेत. यामुळेच पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार जावेद मियांदाद चांगलाच संतापला आहे. त्यामुळेच त्याने ट्विटवर एक व्हिडिओ पोस्ट करुन शांततेचा संदेश देण्यासाठी भारत पाकिस्तान नियंत्रणरेषेवर मोर्चा घेऊन जाणार असल्याचे म्हटले आहे.

‘मी आणि माझ्यासोबत येऊ इच्छिणारे इतर खेळाडू भारत पाकिस्तान नियंत्रणरेषेवर मोर्चा घेऊन जाणारा आहोत. आम्ही दोन्हीकडील नागरिकांना शांततेचा संदेश या माध्यमातून देणार आहोत,’ असं मियांदाद यांनी म्हटले आहे. मात्र मियांदाद यांच्या या मोर्चाचा आम्हाला काहीही फरक पडत नाही असं सांगत जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मियांदाद यांच्या घोषणेतील हवाच काढून टाकली आहे.

‘शांततेचा संदेश देण्यासाठी मी नियंत्रणरेषेवर जाणार आहे. मी देशातील सर्व बड्या व्यक्ती, खेळाडू आणि नागरिकांना आमंत्रित करतो. आम्ही तेथे जाऊन शांततेचा संदेश देणार आहोत. त्यानंतरही परिस्थिती सुधारली नाही तर मी भारत पाकिस्तान सिमेवर जाऊन शांततेचा संदेश देणार आहे. तसेच आम्ही काश्मीरी लोकांसोबत आहोत असंही आपण सांगणार आहे. तेथे असणाऱ्या सर्व सैनिकांना मी शांतीचा संदेश देणार आहे. भारत आणि पाकिस्तानने त्यांच्यातील वाद शांततेने संपवावा असं माझं मत आहे,’ असं मियांदाद यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

याचसंदर्भात जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांना एएनआय या वृत्तसंस्थेने प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मलिक यांनी, ‘तो (मियांदाद) काय करतो यांच्याशी आम्हाला काही देणं-घेणं नाही. आम्ही काय करणार आहोत हे आम्हाला ठाऊक आहे’ असे मत नोंदवले आहे. ‘आम्ही कलम ३७० रद्द केले आहे. त्याचे (सकात्मक) परिणाम येणाऱ्या काळात दिसून येतील. आम्ही येथील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी भरपूर काम करणार आहोत. आम्ही येथील स्थानिकांची ओळख, संस्कृती, नोकऱ्या आणि जमिनींवरील हक्क अबाधित ठेवणार आहोत. येथील परिस्थिती इतकी सुधरेल की पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेलाही काश्मीर हे जगण्यासाठी योग्य ठिकाण आहे असे वाटेल,’ असे मत मलिक यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, पाकिस्तानने कराची हवाई क्षेत्रातील तिन्ही मार्गांवरुन हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाकडून (सीएए) याबाबत नोटीस जारी करण्यात आली आहे. २८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टपर्यंत कराची हवाई हद्दीतून सर्वप्रकारच्या आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीस बंदी घालण्यात आल्याचं, पाकिस्तान नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलंय. कोणत्या कारणामुळे बंदी घालण्यात आली, याची माहिती मात्र देण्यात आलेली नाही. पण पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहेत.