बालाकोटमधील एअरस्ट्राईकनंतर बंद करण्यात आलेली पाकिस्तानची हवाई हद्द तब्बल 140 दिवसांनंतर भारतासाठी मंगळवारी खुली करण्यात आली. पाकिस्तान सिविल एव्हिएशन ऑथॉरिटीकडून एक नोटीस जारी करण्यात आली आहे. दरम्यान, तात्काळ पाकिस्तानची हवाईहद्द खुली करण्यात आल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. यामुळे एअर इंडियाला आणि अन्य विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पाकिस्तानची हवाई हद्द बंद केल्यानंतर एअर इंडियाला तब्बल 491 कोटी रूपयांचे नुकसान सोसावे लागले होते.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला होता. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने एअरस्ट्राईक करत बालाकोटमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर पाकिस्तानचे हवाई क्षेत्र भारतीय विमानांसाठी बंद करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर एअर इंडियाच्या विमानांना इंधन आणि इतर खर्चामुळे दररोज सहा कोटी रूपयांचे नुकसान सोसावे लागत होते.

पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात भारतीय विमानांना जाण्यासाठी बंदी असल्यामुळे नवी दिल्ली ते अमेरिका अशा प्रवासासाठी दोन ते तीन तासांचा अतिरिक्त अवधी लागत होता. तसेच युरोपमध्ये जाण्यासाठीही दोन, अडीच तासांचा अतिरिक्त कालावधी लागत होता. परंतु आता पाकिस्तानने आपली हवाई हद्द भारतीय विमानांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतल्याने भारतीय विमान कंपन्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

तसेच यापूर्वी कर्तारपूर मार्गिकेबाबत भारत व पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या फेरीच्या चर्चेत या मार्गिकेच्या संचालनाबाबतचा मसुदा ८० टक्के मान्य करण्यात आल्याची माहिती, पाकिस्तानी शिष्टमंडळाचे प्रमुख व परराष्ट्र प्रवक्ते महंमद फैजल यांनी दिली होती. वाघा सीमेवर दोन्ही देशातील दोन शीख धार्मिक ठिकाणांना जोडणाऱ्या कर्तारपूर मार्गिकेच्या मसुद्यावर चार तास चर्चा करण्यात आली. मसुद्यातील ८० टक्के मुद्दे मान्य करण्यात आले आहेत. पुढील बैठकीत वीस टक्के मुद्दय़ांवर सहमती होईल. नोव्हेंबरमध्ये पाच ते आठ हजार शीख भाविकांना प्रवेश दिला जाईल, पण नेमकी संख्या आताच सांगता येणार नाही. यातील मसुदा अंतिम होत नाही तोपर्यंत आम्ही त्याचा तपशील जाहीर करणार नाही, असेही फैजल यांनी स्पष्ट केले होते.