संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरला जागतिक दहशतवादी घोषित केल्यानंतर पाकिस्तानने त्याची संपत्ती जप्त करण्याचा आदेश जारी केले आहेत तसेच त्याला प्रवासबंदीही लागू केली आहे. पाकिस्तानने मसूदवर शस्त्रास्त्र आणि दारुगोळयाची खरेदी-विक्री करण्यावरही बंदी घातली आहे.

संयुक्त राष्ट्राच्या इसिस आणि अलकायदा निर्बंध समितीने बुधवारी संध्याकाळी मसूद अझरला जागतिक दहशतवादी घोषित केले. जैशने काश्मीरमधील पुलवामा येथे घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाच्या स्थितीपर्यंत तणाव निर्माण झाला होता. मसूद विरोधात निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश पाकिस्तान सरकारने अधिकाऱ्यांना दिले आहेत. अमेरिका, यूके आणि फ्रान्सने मांडलेल्या प्रस्तावाला चीननेही पाठिंबा दिल्यानंतर अझरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा मार्ग मोकळा झाला.

पुलवामा हल्ल्यानंतर काही दिवसातच फ्रान्स, यूके आणि अमेरिकेने अझरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या अलकायदा निर्बंध समितीमध्ये प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील १५ देशांमध्ये विटो अधिकार असलेला चीनने आपला विशेषधिकार वापरुन अझर विरोधातील प्रस्तावर रोखला होता. पण अखेर आंतरराष्ट्रीय दबावापुढे नमते घेत चीनला माघार घ्यावी लागली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.