पाकिस्तानने पहिल्यांदाच अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन पाकिस्तानात होता अशी कबुली सार्वजनिकपणे दिली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सोमवारी दिलेल्या एका मुलाखतीत, देशातील गुप्तचर संघटनेना आयएसआयनेच अमेरिकेला लादेनबद्दल माहिती दिली होती असा दावा केला आहे. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेट सेंटर या दोन जुळ्या इमारतींवर हल्ला करणाऱ्या ओसामा बिन लादेनचा २०११ रोजी अमेरिकेने पाकिस्तानात घुसून खात्मा केला होता.

महत्त्वाचं म्हणजे याआधी नेहमीच पाकिस्तानने आपल्याला ओसामा बिन लादेनसंबंधी कोणतीही माहिती नव्हती असा दावा केला होता. पण पहिल्यांदाच जाहीरपणे पाकिस्तानने ओसामा बिन लादेन आपल्या भूमीवर असल्याची कल्पना असल्याचं सांगितलं आहे. यावेळी इम्रान खान यांनी लादेनविरोधात करण्यात आलेल्या कारवाईत पाकिस्तानने मदत केल्याचंही सांगितलं.

अमेरिकेच्या दौऱ्यावर असणाऱ्या इम्रान खान यांनी स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, देशातील गुप्तचर संघटना आयएसआयने लादेन पकडला जावा यासाठी त्याची संपूर्ण माहिती अमेरिकेतील हेरखातं सीआयएला दिली होती. मुलाखतीत सांगितल्यानुसार, “फोन कनेक्शनच्या माध्यमातून आयएसआयने सीआयएला लादेनच्या जागेची माहिती पुरवली”. लादेनला पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पाकिस्तानी डॉक्टर शकील अफ्रिदी याची सुटका करणार का ? या प्रश्नावर बोलताना इम्रान खान यांनी हे उत्तर दिलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२ मे २०११ रोजी बोटाबादेत लपलेल्या ओसामा बिन लादेनचा अमेरिकी पथकांनी कारवाई करून खात्मा केला होता. “ओसामा बिन लादेनचा ठावठिकाणा आयएसआयने दिलेल्या माहितीमुळेच लागला होता. जर तुम्ही सीआयएला विचारलं, तर आयएसआयने फोन कनेक्शनच्या माध्यमातून लादेनच्या जागेची माहिती पुरवली”, असं इम्रान खान यांनी सांगितलं आहे.