scorecardresearch

शाहबाझ शरीफ यांचा मार्ग सुकर;  पाकिस्तानात सत्तांतर : इम्रान खान पायउतार, आज पंतप्रधानांची निवड

पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ पक्षाचे (पीएमएल-एन) अध्यक्ष शाहबाझ शरीफ यांनी रविवारी पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल केला.

इस्लामाबाद : गेल्या काही दिवसांतील नाटय़मय राजकीय घडामोडीनंतर पाकिस्तानात रविवारी सत्तापालटावर शिक्कामोर्तब झाले. पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ पक्षाचे (पीएमएल-एन) अध्यक्ष शाहबाझ शरीफ यांनी रविवारी पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल केला. तर दुसरीकडे अविश्वास ठराव मंजूर झाल्याने पंतप्रधानपदावरून पायउतार झालेल्या इम्रान खान यांनी, आपल्या समर्थकांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन करीत पुन्हा स्वातंत्र्याचा लढा सुरू झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.  

पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची निवडणूक आज, सोमवारी होत आहे. पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) सहअध्यक्ष असीफ अली झरदारी यांनी विरोधी आघाडीच्या संयुक्त बैठकीत शाहबाझ यांचे पंतप्रधानपदासाठी नाव सुचवले. शाहबाझ हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे भाऊ आहेत.

पंतप्रधानपदावरून गच्छंतीनंतर इम्रान यांनी आपल्या समर्थकांना परकीय शक्तींच्या ‘आयात सरकार’चा विरोध करण्यासाठी आपल्यासह रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे आवाहन केले. अविश्वास ठराव मंजूर होऊन पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागलेले इम्रान खान हे पाकिस्तानच्या इतिहासातील पहिले पंतप्रधान ठरले. त्यांच्या गच्छंतीनंतर रविवारी पाकिस्तानी संसदेच्या नेतानिवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

विरोधी आघाडीमध्ये समाजवादी, उदारमतवादी आणि कट्टर धार्मिक पक्षांचा समावेश आहे. त्यांनी शेहबाझ शरीफ यांचे पंतप्रधानपदासाठी नामांकन केले आहे. इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षातर्फे माजी परराष्ट्रमंत्री शाह मसूद कुरेशी यांचे पंतप्रधानपदासाठी नामांकन करण्यात आले आहे.

पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी शेहबाझ यांनी संसदेला संबोधित करताना राज्यघटनेला भक्कम पािठबा देणाऱ्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, मला भूतकाळातील कटू स्मृतींना उजाळा द्यायचा नाही. आपल्याला त्या विसरून पुढे वाटचाल करायची आहे. आपण सुडाचे राजकारण करणार नाही अथवा कुणावर अन्यायही करणार नाही. आपण विनाकारण कुणालाही तुरुंगात टाकणार नाही. कायद्यानुसार सर्व कारवाई होईल.

शेहबाझ यांच्यापुढे आव्हाने

शेहबाझ यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर उभा असेल. कारण त्यांना विविध विरोधी विचारसरणीच्या पक्षांसह अपक्षांच्या आघाडीचे नेतृत्व करीत संसदेचा उर्वरित कार्यकाळ पूर्ण करायचा आहे. संसदेचा पाच वर्षांचा कार्यकाळ पुढील वर्षी ऑगस्टमध्ये संपणार आहे.

दोन आगंतुक कोण?

बीबीसी उर्दूने दिलेल्या वृत्तानुसार शनिवारी रात्री पंतप्रधानांच्या निवासस्थानी दोन आगंतुक व्यक्तींना घेऊन एक हेलिकॉप्टर उतरले. त्या व्यक्तींनी इम्रान यांच्याशी सुमारे ४५ मिनिटे चर्चा केली. या बैठकीचे तपशील समजू शकले नाहीत. त्यातील एका अधिकाऱ्याला तासाभरापूर्वी इम्रान यांनी हटवण्याचे आदेश दिले होते. ती व्यक्ती इम्रान यांच्यासाठी अनपेक्षित पाहुणा होती. इम्रान यांना या हेलिकॉप्टरची प्रतीक्षा होती, मात्र त्यातील दोन व्यक्ती त्यांना अपेक्षित नव्हत्या. त्यांना या हेलिकॉप्टरमध्ये नवनियुक्त अधिकारी अपेक्षित होते, मात्र त्यात लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा आणि लेफ्टनंट जनरल अहमद अंजूम असल्याचे समजते. त्यानंतर संरक्षण मंत्रालयानेही कोणतीही नवनियुक्ती जाहीर केली नाही. अर्थात, लष्कराने बीबीसी उर्दूचे वृत्त पूर्णपणे निराधार व खोटे ठरवून फेटाळले आहे.

विशेषसत्र : पाकिस्तानच्या राष्ट्रीय संसदेत आज, सोमवारी नव्या पंतप्रधानांची निवड केली जाईल. त्यासाठी विशेष सत्र बोलावण्यात आले आहे. ३४२ जणांच्या सभागृहात पंतप्रधानपदी निवड होण्यासाठी १७२ मतांची गरज आहे. शाहबाझ शरीफ यांची या पदासाठीची निवड जवळजवळ निश्चित मानली जाते.

लष्करप्रमुखांना हटवण्याचा इम्रान यांचा प्रयत्न? : अविश्वास ठराव मंजूर होईपर्यंत सत्ता राखण्यासाठी इम्रान खान यांची धडपड सुरू होती. त्यांनी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांना हटवण्याचा प्रयत्न केला. इम्रान ‘परकीय कट’ असल्याचा कांगावा करीत आहेत. लष्करप्रमुख बाजवा यांचा पाठिंबा न मिळाल्याने इम्रान यांनी त्यांना अनुकूल व्यक्ती लष्करप्रमुखपदी आणण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.

आपण सुडाचे राजकारण करणार नाही, विनाकारण कुणालाही तुरुंगात टाकणार नाही, कायद्यानुसार कारवाई होईल.

शाहबाझ शरीफ, पंतप्रधानपदाचे उमेदवार

पाकिस्तान १९४७मध्ये स्वतंत्र देश म्हणून उदयास आला; पण सत्ताबदलाच्या परकीय षड्यंत्राच्या विरोधात आज पुन्हा स्वातंत्र्य लढा सुरू झाला आहे.

इम्रान खान, माजी पंतप्रधान

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pakistan political crisis shehbaz sharif set to be next pakistani pm zws

ताज्या बातम्या