पंजाब प्रांतातून एकूण ३० दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये अफगाणिस्तानचे ११ नागरिक आणि बंदी घालण्यात आलेल्या तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेतील दहशतवाद्यांचा समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले.

दहशतवाद्यांविरोधात देशव्यापी मोहीम हाती घेण्यात आली असून पंजाब प्रांतात त्याचाच एक भाग असलेली रद-ऊल-फसद म्हणजेच दहशतवाद्यांचा नि:पात ही मोहीम रेंजर्स आणि पोलिसांनी राबविली. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीवरून सुरक्षा रक्षकांनी लाहोर, रावळपिंडी, सियालकोट आणि इस्लामाबाद या शहरांमध्ये गेल्या दोन दिवसांत छापे टाकले, असे लष्कराने म्हटले आहे.

सुरक्षा रक्षकांनी २६ संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले असून त्यामध्ये अफगाणिस्तानच्या ११ नागरिकांचा समावेश आहे. त्यांच्याकडून शस्त्रे, स्फोटके, आत्मघातकी हल्ल्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या जॅकेटचे साहित्या जप्त केले. या संशयितांना चौकशीसाठी अज्ञात स्थळी नेण्यात आले आहे.

अन्य एका ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्यांत दहशतवाद प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेच्या चार दहशतवाद्यांना रावळिपडी येथून अटक केली. रावळपिंडीत सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले करण्याची योजना या दहशतवाद्यांनी आखली होती. त्यांच्याकडून एक किलो स्फोटक साहित्य, चार डिटोनेटर्स, एक हातबॉम्ब जप्त करण्यात आला. देशात करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात १२५ हून अधिक जण ठार झाल्यानंतर गेल्या महिन्यापासून रद-ऊल-फसद मोहीम हाती घेण्यात आली आहे.

बांगला देशातील कारवाईत एका महिलेसह ४ दहशतवादी ठार

ढाका : चितगाँवमधील एका घरात दडून बसलेल्या इस्लामी दहशतवाद्यांविरुद्ध सुरक्षारक्षकांनी केलेल्या कारवाईत एका महिलेसह चार दहशतवादी ठार झाले आहेत. बांगला देशात अलीकडेच अनेक दहशतवादी हल्ले करण्यात आले. त्यानंतर दहशतवाद्यांविरोधात देशव्यापी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

आतापर्यंत आम्हाला चार मृतदेह मिळाले आहेत. त्यापैकी दोन जणांच्या शरीरावर आत्मघातकी जॅकेट होते आणि त्याच्या स्फोटात ते ठार झाले तर अन्य दोघे पोलिसांच्या गोळ्या लागल्याने ठार झाले, असे चितगाँव परिमंडळाचे पोलीस उपमहानिरीक्षक शफीकल इस्लाम यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.

पोलिसांनी सदर घरावर कारवाई करण्यास सुरुवात केली तेव्हा पोलिसांवर हातबॉम्ब फेकण्यात आले, त्यामध्ये तीन पोलीस जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका महिलेसह चार दहशतवादी ठार झाले. दहशतवाद प्रतिबंधक, शीघ्र कृती बटालियन, चितगाँव जिल्हा पोलीस आदींनी संयुक्तपणे ‘अ‍ॅसॉल्ट १६’ मोहीम हाती घेतली.

ठार झालेले दहशतवादी जमातुल मुजाहिद्दीन बांगला देशचे (जेएमबी) दहशतवादी असल्याचा संशय आहे. त्यांनी सुरक्षारक्षकांवर हातबॉम्ब फेकले आणि गोळीबारही केला. जेएमबीच्या दहशतवाद्यांचा रात्रभर शोध घेतल्यानंतर चकमकीला सुरुवात झाली. जवळपास १० मिनिटे स्फोटांचे आवाज ऐकावयास येत होते, असे एका पत्रकाराने सांगितले.

भाडेकरू असल्याचे ढोंग करून दहशतवादी या घरांत राहात होते. चकमक संपल्यानंतर त्या घरातील २० रहिवासी इमारतीच्या बाहेर आले. त्यामध्ये महिला आणि सात कुटुंबातील मुलांचा समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले.