तुरुंग कर्मचाऱ्याने केलेल्या मारहाणीत मृत्यू झालेल्या कोट लखपत येथील भारतीय कैद्याला न्याय मिळवून देण्यासाठी आता पाकिस्तानातील वकील सरसावले आहेत़  पाकिस्तानातील भारतीय कैद्यांना मदत करणारे वकील अवाईझ शेख यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करणारी याचिका मंगळवारी लाहोर उच्च न्यायालयात दाखल केली़  विशेष म्हणजे या याचिकेमुळे संबंधित अधिकाऱ्यांनी आपसूकच या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली आह़े
चंबल सिंग हे साठ वर्षीय भारतीय हेरगिरीच्या गुन्हय़ाखाली पाच वर्षांची सजा भोगत होता़  १५ जानेवारी रोजी त्याचा मृत्यू झाला़  त्यानंतर सुमारे दोन आठवडय़ांपर्यंत त्यांचा मृतदेह जिन्ना शासकीय रुग्णालयाच्या शवागारात पडून होता़  सिंग यांच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी लखपत तुरुंगातून सुटका झालेल्या तेहसीन खान नावाच्या एका वकीलाने सिंग यांच्या मृत्यूची बातमी शेख यांना दिली़
सिंग यांना तुरुंग कर्मचाऱ्याकडून प्रचंड मारहाण झाल्याच्या घटनेचा खान हा प्रत्यक्ष साक्षीदार आह़े  त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत सिंग यांना जिन्ना तुरुंगात दाखल करण्यात आल़े  तेथेच त्यांचा मृत्यू झाला़  तुरुंग अधिकाऱ्यांना सिंग यांचा मृत्यू मारहाणीत झाल्याचे खान यांनी सांगण्याचा प्रयत्न केला़  परंतु, ते अमान्य करीत तुरुंग अधिकाऱ्यांना त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचेच निक्षून सांगितल़े  खान यांनी जिन्ना रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सिंगचा मृतदेह शवविच्छेदनाविना दोन आठवडय़ांपासून शवागारात पडून असल्याची माहिती मिळाली़
खान यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शेख यांनी न्यायालयाकडे या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्याची तसेच दोषींवर कारवाईची मागणी केली आह़े
या प्रकरणात न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत़  न्यायदंडाधिकारी अफझल अब्बास यांनी सिंग यांच्यासोबत कोठडीत असणाऱ्या १४ भारतीय कैद्यांचा जबाब नोंदविला असल्याचे कळत़े  लखपत तुरुंगात सध्या ३३ भारतीय कैदी आहेत़  या कार्यवाहीमुळे त्यांना काहीसा दिलासा मिळणार आह़े