गाझा, जेरुसलेम : इस्रायली सैन्याने उत्तर गाझामध्ये हवाई आणि जमिनीवरून हल्ल्यांची तीव्रता वाढवल्यानंतर तेथील पॅलेस्टिनींनी स्थलांतर करण्याचा वेग वाढला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी मदतीसाठी समन्वय कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी जवळपास १५ हजार जणांनी उत्तर गाझामधून स्थलांतर केले. सोमवारी पाच हजार, तर रविवारी दोन हजार लोकांनी स्थलांतर केले होते.
गाझामधील जमिनीवरील हल्ल्यात भुयारांच्या जाळय़ाला लक्ष्य करण्यात आले अशी माहिती इस्रायली लष्कराकडून देण्यात आली. तसेच हवाई हल्ल्यामध्ये हमासचे अनेक अतिरेकी ठार झाल्याचेही इस्रायलने सांगितले. हे अतिरेकी रणगाडाविरोधी कारवाया आणि जमिनीवरून जमिनीवर रॉकेटहल्ला करत होते, अशी माहिती देण्यात आली.
हेही वाचा >>> VIDEO : पॅलेस्टाईनच्या राष्ट्रपतींवर जीवघेणा हल्ला, महमूद अब्बास थोडक्यात बचावले
गाझावर गेली १६ वर्षे सत्ता गाजवणाऱ्या हमासला चिरडून टाकण्याचा निर्धार केलेल्या इस्रायलने उत्तर गाझा, विशेषत: गाझा शहर आणि आजूबाजूच्या गर्दीच्या शहरी निर्वासित छावण्यांना लक्ष्य केले आहे. त्यामध्ये सामान्य पॅलेस्टिनींचा मोठय़ा प्रमाणात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पॅलेस्टिनी आता तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. याबरोबरच दक्षिण गाझामध्येही इस्रायली सैन्याच्या हवाई हल्ल्यांमध्ये नागरी वसाहतींचे नुकसान झाले.
गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत १०,३०० पेक्षा जास्त पॅलेस्टिनी युद्धात ठार झाले असून त्यामध्ये ४,२०० पेक्षा लहान मुलांचा समावेश आहे. गाझामधील २३ लाख लोकसंख्येपैकी ७० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना त्यांचे घर सोडणे भाग पडले आहे. वाढती जीवितहानी आणि स्थलांतराचा वेग पाहता, तात्पुरत्या युद्धविरामासाठी इस्रायलवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत आहे.
‘जी ७’ देशांची एकत्रित भूमिका
‘जी ७’ या श्रीमंत औद्योगिक देशांनी सोमवारी युद्धाबद्दल एकत्रित भूमिका जाहीर केली. युद्धग्रस्त गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी लोकांपर्यंत विनाअडथळा अन्न, पाणी, औषधे आणि इंधन पोहोचते केले जावे आणि ‘मानवतावादी युद्धविराम’ घेण्यात यावा असे आवाहन जी७ कडून करण्यात आले. यामुळे इस्रायलवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.
रुग्णालयातील इंधन संपण्याची भीती
गाझामधील अल कुद्स या रुग्णालयातील इंधन पुरवठा बुधवारी संपेल, असा इशारा पॅलेस्टाईन रेड क्रिसेंट या मदतसंस्थेने दिला. इस्रायलने गाझामध्ये मदत सामग्री पोहोचती करण्यास परवानगी दिली असली तरी इंधनाचा पुरवठा मात्र रोखून धरला आहे.