‘पॅराडाईज पेपर्स’मुळे जगभरात एकच खळबळ उडाली. भारतासह जगभरातील अनेक बडे उद्योगपती, मातब्बर राजकीय नेते आणि प्रख्यात कलाकार यांच्या नावांचा समावेश ‘पॅराडाईज पेपर्स’मध्ये असल्याने जगात मोठा भूकंप झाला आहे. श्रीमंत व्यक्ती आणि बलाढ्य कंपन्यांकडून केली जाणारी करचोरी, हा पैसा परदेशात पाठवण्यासाठी वापरली जाणारी पद्धत आणि परदेशात गेलेला काळा पैसा पांढरा करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या बोगस कंपन्या अशी संपूर्ण साखळी ‘पॅराडाईज पेपर’मुळे उजेडात आली आहे.

पॅराडाईड पेपर नक्की आहे काय?
तब्बल १ कोटी ३४ लाख कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर जगभरातील कंपन्या आणि व्यक्तींचे आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आले. यामधील बहुतांश कागदपत्रे बर्म्युडामधील लॉ फर्म अॅपलबाय आणि सिंगापूरमधील एशियासिटी ट्रस्टशी संबंधित आहेत. अॅपलबाय आणि एशियासिटीकडून अनेक कंपन्या आणि श्रीमंत व्यक्तींचा पैसा ‘मॅनेज’ केला जातो. कर चुकवेगिरी करुन हा पैसा परदेशात वळवला जात असल्याने त्यासाठी ‘टॅक्स पॅराडाईज’ हा शब्द वापरला जातो. त्यामुळेच या आर्थिक गैरव्यवहाराला ‘पॅराडाईज पेपर्स’ असे नाव देण्यात आले आहे.

कोणी केला तपास ?
जर्मनीतील ‘सुददॉइश झायटुंग’ या वृत्तपत्राच्या पुढाकाराने ‘पॅराडाईज पेपर्स’ प्रकरणाचा तपास झाला. या वर्तमानपत्राने त्यांच्याकडे असणारी माहिती इंटरनॅशनल कॉन्सोर्टियम ऑफ इन्वेस्टिगेटिव्ह जर्नलिस्टसोबत (आयसीआयजे) शेअर केली. ‘पॅराडाईज पेपर्स’चे भारतीय कनेक्शन उजेडात आणण्यात ‘इंडियन एक्स्प्रेस’ने महत्त्वाची भूमिका बजावली. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या प्रतिनिधीने भारताशी संबंधित असलेल्या आर्थिक गैरव्यवहारांची पडताळणी केली. यासाठी १० महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागला.

‘पॅराडाईज पेपर्स’मधून काय उघडकीस आले?
भारतातील बलाढ्य कंपन्या आणि बड्या व्यक्तींची नावे ‘पॅराडाईज पेपर्स’मधून उघडकीस आली आहेत. देशात कर न भरता तो पैसा परदेशातील बोगस कंपन्यांमध्ये कसा गुंतवला जातो, हे ‘पॅराडाईज पेपर्स’मधून समोर आले. विशेष म्हणजे भारतीय कंपन्या आणि व्यक्तींचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी परदेशात स्थापन करण्यात आलेल्या बोगस कंपन्या भारतातून नियंत्रित केल्या जात असल्याचे ‘पॅराडाईज पेपर्स’मधून दिसून आले.

कसे व्हायचे आर्थिक गैरव्यवहार?
बर्म्युडातील अॅपलबाय कंपनी भारतासह जगभरातील अनेकांचा करचोरीतून आलेला पैसा हाताळत असल्याचे उघडकीस आले आहे. ही कंपनी भारतातून बाहेर जाणारा काळा पैसा परदेशांमधील बोगस कंपन्यांमध्ये गुंतवत असल्याचे तपासातून समोर आले. धक्कादायक बाब म्हणजे भारतातून निर्माण होणारा हा काळा पैसा परदेशातील कंपन्यांमध्ये गुंतवल्यावर तो पुन्हा भारतीय कंपन्यांमध्ये वळवला जात असे. याबद्दल खुद्द अॅपलबायने अनेकदा धोक्याचा इशारा दिला होता.

भारताला काय तोटा झाला?
परदेशातील बोगस कंपन्यांनी कर्जाची उभारणी केल्यावर त्यांच्याकडून हमी देण्यासाठी भारतीय कंपन्यांच्या मालमत्तांचा वापर केला जात होता. विशेष म्हणजे भारतातील नियामकांना याची कोणतीही माहिती न देता ही प्रक्रिया पार पाडली जात होती. यासोबतच परदेशातील बोगस कंपन्यांची मालकी बदलण्याचा अर्थ या कंपनीतील भारतीय कंपनीच्या समभागांची मालकी बदलणे असा असतानाही त्याबद्दल भारत सरकारला कोणताही कर दिला गेला नाही. या सर्व धक्कादायक बाबी ‘पॅराडाईज पेपर्स’मधून उघडकीस आल्या.