केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी ‘पॅराडाईज पेपर्स’वर प्रतिक्रिया दिली आहे. मी ओमिड्यार कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी होतो. यानंतर ‘ओमिड्यार’ने गुंतवणूक केलेल्या डी. लाईट या कंपनीत मी स्वतंत्र संचालकपदी होतो. मात्र मंत्रिपदी विराजमान होताच मी कंपनीतील पदाचा राजीनामा दिला होता, असे स्पष्टीकरण सिन्हा यांनी दिले आहे.

पॅराडाईज पेपर्समध्ये नाव आल्याने जयंत सिन्हा अडचणीत आले आहेत. २०१४ मध्ये झारखंडमधील हजारीबागमधून लोकसभेत निवडून गेल्यावर आणि मोदी सरकारमध्ये मंत्रिपदी विराजमान होण्यापूर्वी जयंत सिन्हा हे ओमिड्यार कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर होते. ओमिड्यारने अमेरिकेतील डी. लाईट या कंपनीत गुंतवणूक केली होती. डी.लाईट कंपनीची एक शाखा कॅरेबियन बेटांमधील कॅमेन येथे होती. ‘अॅपलबाय’च्या कागदपत्रांवरुन हा खुलासा झाला आहे. मात्र जयंत सिन्हा यांनी उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आणि खासदार झाल्यावर लोकसभा सचिवालयाला याबाबत माहिती दिली नाही. मात्र पंतप्रधान कार्यालयाला २०१६ मध्ये दिलेल्या माहितीत याबाबत मोघम उल्लेख होता.

डी. लाईट डिझाईन इंकने त्यांच्या कंपनीचा भाग असलेल्या कॅमेनमधील डिझाईन इंकच्या शाखेला एका परदेशी कंपनीकडून ३० लाख डॉलर्सचे कर्ज घेण्याची परवानगी दिली होती. या व्यवहाराला परवानगी देण्याबाबतच्या कागदपत्रांवर सिन्हा यांची स्वाक्षरी होती. या व्यवहाराबाबत अॅपलबायने कायदेशीर सल्ला दिला होता. त्यामुळे या व्यवहारावर आता प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सोमवारी पॅराडाईज पेपर्स प्रकरणात नाव आल्यानंतर जयंत सिन्हा यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली. पॅराडाईज पेपर्स प्रकरणात मी ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्राला माझी बाजू सांगितली आहे. मी मंत्रिपदावर विराजमान होण्यापूर्वीच या कंपनीच्या पदाचा राजीनामा दिला होता, असे त्यांनी सांगितले. ओमिड्यार आणि माझ्यात जे व्यवहार झाले ते कायदेशीर होते, असा दावा त्यांनी केला.

बर्म्युडामधील ‘अॅपलबाय’ या कायदेशीर सेवा पुरवणाऱ्या कंपनीची १३. ४ दशलक्ष कागदपत्रे ‘पॅराडाईज पेपर्स’मध्ये उघड करण्यात आली आहेत. बोगस कंपन्यांमार्फत मोठ्या प्रमाणात पैसा फिरवल्याचे उघड झाले आहे.