भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर करण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा पक्षामध्ये दुफळी उफाळून आलीये. 
पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज आणि मुरलीमनोहर जोशी यांनी मोदी यांचे नाव इतक्या लवकर जाहीर करू नये, यासाठी दबाव आणल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. त्याचबरोबर मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करायचे असेल, तर पहिल्यांदा त्यांनी गुजरातमधील मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशीही मागणी पक्षातील काही नेत्यांनी केल्यामुळे पक्षामधील फूट पुन्हा एकदा स्पष्ट झाली. भाजपमधील मोदी समर्थक नेत्यांनी त्यांचे नाव पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावे, यासाठी पक्षनेतृत्त्वावर दबाव टाकण्यास सुरूवात केली आहे. त्याचवेळी मोदी विरोधकांनी त्यांचे नाव जाहीर करणे जास्तीत जास्त लांबणीवर टाकण्यासाठी आपले बळ लावले असल्याचे चित्र दिसते आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह, एम. वैंकय्या नायडू आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते रामलाल यांनी मोदी यांचे नाव लवकरात लवकर जाहीर करण्याच्या बाजूने आपले मत टाकले आहे. जास्तीत जास्त पुढील महिन्यात संसदेचे पावसाळी अधिवेशन संपण्याआधी मोदी यांचे नाव जाहीर करण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.