* देशभर संताप
* बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
* जलदगती न्यायालयात दैनंदिन सुनावणी करणार
देशाच्या राजधानीत भरधाव बसमध्ये एका २३ वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने मंगळवारी अवघी संसद सुन्न झाली. सुसंस्कृततेला, सभ्यतेला काळीमा फासणाऱ्या या घृणास्पद घटनेचे तीव्र पडसाद संसदेत उमटले. या घटनेचा निषेध करताना राज्यसभेत खासदार जया बच्चन यांना तर अश्रू आवरले नाहीत. यापुढे असे गुन्हे करण्याची कोणाची हिंमत होऊ नये यासाठी या बलात्काऱ्यांविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवून, त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सदस्यांनी केली. त्यावर, दिल्लीच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेले केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या प्रकरणाची विशेष न्यायालयात दैनंदिन सुनावणी करण्यात येईल, अशी घोषणा केली. केंद्रीय गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली विशेष कृती दलाची स्थापना करण्यात येत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
लोकसभेच्या अध्यक्ष मीराकुमार, विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज आणि काँग्रेसच्या गिरीजा व्यास यांच्यासह तमाम राजकीय पक्षांच्या सदस्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आणि दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. राज्यसभेत बसप अध्यक्ष मायावती, भाजपच्या माया सिंह आणि स्मृती इराणी, समाजवादी पक्षाच्या जया बच्चन यांनी निष्क्रिय सरकारला धारेवर धरले. बलात्कारातील आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी मायावती यांनी केली. या घटनेने लोकसभेलाही ढवळून काढले.
या घटनेचे वर्णन करण्यास, अत्यंत घृणास्पद कृत्य, याहून अधिक योग्य शब्द नाही. या घटनेतील पीडित मुलगी जगूही शकत नाही आणि मरूही शकत नाही. अशा बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा का होऊ नये?
सुषमा स्वराज , विरोधी पक्षनेत्या (लोकसभा)
ती तरूणी मरणाच्या दारात
रविवारी रात्री साडेनऊच्या सुमाराला आपल्या मित्रासोबत चित्रपट बघून एका खासगी बसमधून घरी परतणाऱ्या
एका २३ वर्षीय मुलीवर बसचालकासह सहा जणांनी सामूहिक बलात्कार करून तिला रस्त्यात बाहेर फेकून दिले होते. तिच्यावर सफदरजंग इस्पितळात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती मंगळवारी बिघडली असून तिला कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले आहे.
चार नराधमांना अटक
निमवैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण घेण्यासाठी उत्तराखंडातून दिल्लीत आलेल्या २३ वर्षीय तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी बसचा चालक रामसिंह, त्याचा भाऊ मुकेश, व्यायामशाळेती प्रशिक्षक विनय शर्मा आणि फळविक्रेता पवन गुप्ता या चौघा आरोपींना पकडण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे. दोघे जण अद्याप फरार असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी मोठय़ा प्रमाणात शोधसत्र आरंभले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Dec 2012 रोजी प्रकाशित
संसदही सुन्न झाली!
* देशभर संताप * बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी * जलदगती न्यायालयात दैनंदिन सुनावणी करणार देशाच्या राजधानीत भरधाव बसमध्ये एका २३ वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने मंगळवारी अवघी संसद सुन्न झाली. सुसंस्कृततेला, सभ्यतेला काळीमा फासणाऱ्या या घृणास्पद घटनेचे तीव्र पडसाद संसदेत उमटले.

First published on: 19-12-2012 at 04:19 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parlament also numbed