नवी दिल्ली : संसदेत ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चा, गोंधळ यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांच्या बैठकीमध्ये विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीची खल्ली उडवली. विरोधक स्वत:च्या पायावर दगड मारून घेणार असेल तर, आपण तरी काय करणार, अशी उपहासात्मक टिप्पणी मोदींनी केली.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच मोदींनी ‘रालोआ’च्या खासदारांची बैठक घेतली. चर्चेमधील भाषणात मी सुरुवातीलाच सांगितले होते की, मी इथे भारताची बाजू मांडण्यासाठी आलो आहे, असे सांगत विरोधकांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चेची मागणी करून घोडचूक केल्याचे मोदी यांनी सूचित केले. ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा करून विरोधकांनी स्वत:ची फजिती करून घेतली. असे विरोधक कुठे मिळतील, जे स्वत:च्या पायावर दगड मारून घेतील. विरोधकांनी अशीच रोज चर्चेची मागणी करत राहावी, हे तर माझे क्षेत्र आहे, असे मोदी म्हणाल्याचे समजते.

सर्वोच्च न्यायालयानेच राहुल गांधींचे कान ओढले असताना आता आपण तरी काय बोलणार? राहुल गांधींचा हा प्रकार म्हणजे आ बैल मुझे मार असेच झाले, अशी उपहासात्मक टीका मोदींनी केल्याचे समजते.

मोदींकडून शहांचे कौतुक

माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्यानंतर सर्वात जास्त काळ केंद्रीय गृहमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळल्याबद्दल मोदींनी अमित शहांचे बैठकीत कौतुक केले. ५ ऑगस्ट २०१९ रोजी शहांनीच अनुच्छेद ३७० रद्द करण्याचे विधेयक लोकसभेत मांडले, त्याला मंगळवारी ६ वर्षे पूर्ण झाली. हे निमित्त साधून मोदींनी शहांच्या पाठीवर थाप मारल्याचे मानले जात आहे.