पीटीआय, नवी दिल्ली

संसदेच्या अधिवेशनाचा सोमवारपासून तिसरा आठवडा सुरू असून दोन्ही सभागृहांमध्ये महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेण्यासाठी सरकार प्रयत्न करण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने बिहारमध्ये हाती घेतलेल्या मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीच्या (एसआयआर) मुद्द्यावरून दोन आठवड्यांपासून संसदेचे कामकाज जवळपास ठप्प पडले आहे.

लोकसभेच्या कामकाजाच्या यादीमध्ये राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयकाचा समावेश आहे. क्रीडा मंडळांच्या कामकाजामध्ये अधिक पारदर्शकता आणण्याचा या विधेयकाचा उद्देश आहे. हे विधेयक सोमवारीच मंजूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तर, राज्यसभेत मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीला १८ ऑगस्टपासून सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा ठराव गृहमंत्री अमित शहा यांनी मांडला आहे.

सुरुवातीला ‘एसआयआर’च्या मुद्द्यावरून ‘इंडिया’ आघाडीच्या घटक पक्षांमध्ये एकवाक्यता नव्हती. नंतर मात्र, सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘एसआयआर’चा उपक्रम भाजपच्या राजकीय फायद्यासाठी राबवला जात असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. दुसरीकडे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर थेट मतांची चोरी करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र, हे आरोप निराधार, बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे आहेत असा खुलासा निवडणूक आयोगाने एक निवेदन प्रसृत करून केला आहे.

अधिवेशनाचा वेळ वाया

संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैला सुरू झाले तेव्हापासून विरोधक एसआयआरवर चर्चा करण्याची मागणी करत आहेत. मात्र, ती मान्य करण्यास सरकार उत्सुक नाही. या मुद्द्यावरून संसदेच्या अधिवेशनाचा बराचसा वेळ वाया गेला आहे. मागील आठवड्यात पहलगाम हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’च्या मुद्द्यावर दोन्ही सभागृहांमध्ये प्रत्येकी दोन दिवस चर्चा झाली. ही चर्चा वगळता फारसे ठोस कामकाज झाले नाही.

पंतप्रधान आणि राष्ट्रपतींची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. मात्र, या भेटीचे तपशील समजू शकले नाहीत. राष्ट्रपती भवनाच्या कार्यालयाने ‘एक्स’वरून या भेटीची माहिती दिली. मात्र, संसदेतील ठप्प झालेले कामकाज, पहलगाम व ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चा आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के आयातशुल्क लादण्याची केलेली एकतर्फी घोषणा या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्यामुळे त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.