टोरांटो : कॅनडातील संसदीय निवडणुकीत सोमवारी पंतप्रधान जस्टीन त्रुदो यांच्या लिबरल पक्षाला विजय मिळाला असून बहुमत मात्र हुकले आहे. दोन वर्षांपूर्वी  निकाल जसे लागले होते तसेच आताही लागले असून बहुमत मिळवण्याचा त्रुदो यांचा मनसुबा पूर्ण झालेला नाही. लिबरल्सला तुलनेने जास्त जागा मिळाल्या असून लिबरल पक्षाचे नेतृत्व करताना त्रुदो  यांनी दोन निवडणुकांत विजय संपादन केला आहे. त्यांना त्यांचे वडील दिवंगत पंतप्रधान पिअरी त्रुदो यांचा वारसा लाभला असून त्यांच्या वडिलांनी २०१५ मध्ये पक्षाचे नेतृत्व केले होते. त्रुदो यांच्या लिबरल पक्षाचे उमेदवार १५६ जागांवर आघाडीवर आहेत.  २०१९ पेक्षा ही संख्या १ ने कमी आहे. बहुमतासाठी १७० जागा हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मिळणे अपेक्षित असताना त्यांना त्यापेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. कॉन्झर्वेटिव्ह पक्षाला  १२१ जागांवर आघाडी मिळाली असून त्यांना २०१९ मध्ये तेवढ्याच जागा मिळाल्या होत्या. डाव्या न्यू डेमोक्रॅट्सना २७ जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यांना यावेळी तीन जागा जास्त मिळताना दिसत आहेत. ग्रीन्सला २ जागा मिळाल्या असून क्युबेकॉइसला  ३२ जागांवर समाधान मानावे लागत आहे. सध्या अल्पमतात असलेल्या त्रुदो यांनी बहुमताच्या आशेने  या निवडणुका घेतल्या.