मिठू, मिठू बोलणारा पोपट अचानक ‘उसने मारा, उसने मारा’ असे ओरडू लागला आणि एका खुनाचा गुन्हा उलगडला. आपल्या मालकिणीचा खून करणाऱ्या मारेकऱ्याला पाहून उसने मारा, उसने मारा असे ओरडणाऱ्या पोपटामुळे खऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. येथील बालकेश्वर वसाहतीमध्ये ही घटना घडली.
एका हिंदी दैनिकाचे संपादक विजय शर्मा यांच्या पत्नी नीलम २० फेब्रुवारी रोजी आपल्या घरातच मृतावस्थेत आढळल्या. पोलीस आरोपीचा कसून शोध घेत असतानाही त्यांच्या हाती कोणतेही धागेदोरे लागत नव्हते. विजय शर्मा यांचा पुतण्या आशुतोष शर्मा गोस्वामी हा जेव्हा घरी येत असे, तेव्हा घरातील पोपटाचे वर्तन विचित्र होत असल्याचे विजय यांच्या लक्षात आले.
आशुतोष शर्मा जेव्हा त्या पोपटाच्या िपजऱ्याजवळून जात असे, तेव्हा पोपट काहीसा अस्वस्थ झाल्याचे पाहावयास मिळत होते, असे विजय शर्मा यांचे बंधू अजय शर्मा यांनी सांगितले. पोपटाच्या वर्तनामुळे संशय बळावत चाललेल्या कुटुंबीयांनी पोपटासमोरच संशयितांची नावे घेण्यास सुरुवात केली.
जेव्हा कुटुंबीयांनी आशुतोषचे नाव घेतले, तेव्हा पोपट उसने मारा, उसने मारा, असे ओरडू लागला. कुटुंबीयांनी ही घटना पोलिसांना सांगितली. पोलिसांनी आशुतोषला ताब्यात घेऊन त्याची ‘चौकशी’ केली असता त्याने गुन्ह्य़ाची कबुली दिली.
रॉनी मेस्सी या मित्रासह आपण शर्मा कुटुंबीयांच्या घरी आलो आणि नीलम यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. नीलम आपल्याला ओळखतील या भीतीने आशुतोषने त्यांच्यावर शस्त्राने हल्ला केला त्यामध्ये नीलम मरण पावल्या. हा प्रकार सुरू असताना घरातील कुत्रा भुंकू लागला, तेव्हा त्याचाही खात्मा करण्यात आला. आशुतोष आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे.