चिराग पासवान यांना धक्का; पशुपति पारस यांची लोकसभा पक्ष नेतेपदी अधिकृतरित्या वर्णी

पशुपति पारस यांची लोकसभेच्या संसदीय पक्ष नेतेपदी वर्णी लागली आहे. पशुपति पारस यांची निवड पाच खासदारांनी केली होती.

Pashupati Paras
लोक जनशक्ति पार्टीचे खासदार पशुपती पारस यांची संसदीय पक्ष नेतेपदी नियुक्ती (फोटो सौजन्य- ANI)

लोक जनशक्ति पार्टीतील अंतर्गत कलहामुळे चिराग पासवान यांना फटका बसला आहे. लोक जनशक्ति पार्टीच्या पाच बंडखोर खासदारांची मागणी सभापतींनी स्वीकारली आहे. त्यामुळे चिराग पासवान यांचं लोकसभेतील संसदीय पक्षाचं नेतेपद गेलं आहे. आपल्या वेगळा गट म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी पाच खासदारांनी केली होती. त्यामुळे आता त्यांच्या जागेवर पशुपति पारस यांची लोकसभेच्या संसदीय पक्ष नेतेपदी वर्णी लागली आहे. लोक जनशक्ति पार्टीच्या संसदीय नेतेपदी पशुपति पारस यांची निवड पाच खासदारांनी केली होती. पशुपति पारस यांच्यासह खासदार चौधरी महबूब अली कैसर, वीणा देवी, चंदन सिंह आणि प्रिंस राज यांचा यात समावेश होता. आता लोकसभा सचिवालयाने यावर शिक्कामोर्तब केल्याने पशुपति पारस यांची अधिकृतरित्या संसदीय पक्ष नेतेपदी नियुक्ती झाली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचा आदेश जारी केला आहे.

बंडामागे चिराग पासवान यांचे काका आणि हाजीपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार पशुपती कुमार पारस हे असल्याचं बोललं जात आहे. चिराग पासवान मनमानी कारभार करत असल्यानं ते नाराज होते. “मी पक्षात फूट पाडली नाही, पक्ष वाचवला आहे. चिराग पासवानच्या नेतृत्वावर ९९ टक्के कार्यकर्ते नाराज होते. बिहारमध्ये २०२० च्या विधानसभा निवडणुकीतील प्रदर्शनामुळेही संभ्रम निर्माण झाला होता. जेडीयूविरोधात लढणं महागात पडलं’, असं हाजीपूरचे खासदार पशुपती पारस यांनी सांगितलं.

लोक जनशक्ती पार्टीची सूत्रं चिराग पासवान यांच्याकडे आल्यापासून पाचही खासदार नाराज होते. बिहार विधानसभा निवडणूक जदयू आणि भाजपासोबत न लढता स्वतंत्र लढण्याचा निर्णय चिराग पासवान यांनी घेतल्यानं खासदारांच्या नाराजीत आणखी भर पडली होती. तेव्हापासूनच लोक जनशक्ती पार्टी फूट पडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाऊ लागली होती. पण या दिशेनं कधी पावलं टाकली जाणार याबद्दल मात्र, खात्रीने कुणीही बोलत नव्हतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pashupati paras has been appointed as new parliamentary party leader of lok janshakti party rmt