असं समजा की तुम्ही एखाद्या विमानाने प्रवास करत आहात आणि वैमानिकाने म्हणजेच पायलेटने अचानक आता मी विमान उडवणार नाही, अशी भूमिका घेत काम करण्यास नकार दिला तर? असं झाल्यास तुम्ही नक्की काय कराल?, असा प्रश्न विचारला तरी गोंधळून जायला होईल ना?, पण पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या एका विमानामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खरोखरच हा अनुभव आला. झालं असं की विमानाने उड्डाण घेतल्यानंतर विमान काही कारणाने मध्येच एका ठिकाणी उतरवण्यात आलं. मात्र त्यानंतर पुन्हा उड्डाण करण्यास वैमानिकाने नकार दिला. वैमानिकाने शिफ्ट संपल्याचं सांगत या क्षणापासून पुढे मी विमान उडवणार नाही असं सांगत काम करण्यास नकार दिला. त्यानंतर विमानातील प्रवासी चांगलेच संतापले.

विमानामध्ये वैमानिकाने ही अगदीच अनपेक्षित घोषणा केल्यानंतर फारच गोंधळ उडाला. विमान इस्लामाबाद विमानतळावर उतरवणार नाही असं वैमानिकाने सांगितलं. माझ्या कामाचा वेळ संपल्याने मी विमान पुन्हा टेक ऑफ करणार नाही, असं हा वैमानिक सांगू लगाला. बराच गोंधळ झाल्यानंतर अखेर विमानतळावरील अधिकारी सुरक्षारक्षकांच्या मदतीने मध्यस्थी करुन विमान पुढच्या प्रवाशाला निघालं. विमानामध्ये वैमानिक आणि प्रवाशांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. वैमानिकाने विमान उडवण्यास नकार दिला तर आम्ही सुद्धा विमानातून उतरणार नाही असं प्रवाशांनी सांगितलं. अखेर मध्यस्थीनंतर प्रकरण निवळलं.

पाकिस्तानमधील द एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार पीआयए प्रशासनाने याबद्दलची माहिती दिली. पीके ९७५४ या विमानाने सौदी अरेबियाची राजधानी रियादवरुन उड्डाण केलं. मात्र त्यानंतर हवामान खराब असल्याने विमानाला दम्मममध्ये उतरवण्यात आलं. हवामान आणि संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर विमानाच्या वैमानिकाने इस्लामाबादला जाण्यास नकार दिला. माझी शिफ्ट संपल्याने मी आता विमान उडवू शकत नाही, असं या वैमानिकाने घोषित केलं. तांत्रिक दृष्ट्या एका विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर अशाप्रकारे मध्येच थांबवं लागल्यास तोच वैमानिक विमान पुढे घेऊन जातो. मात्र या प्रकरणामध्ये वैमानिकाने ड्युटी अवर्स संपल्याचं सांगत विमान उडवण्यास नकार दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विमानातील प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विमानाने उड्डाण करण्याआधी वैमानिकांना पुरेसा आराम मिळणं आवश्यक असतं, असं पीआयएच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. त्याच हिशोबाने वैमानिकांच्या कामाचं नियोजन केलं जातं. यापूर्वी पीआयएकडून सौदी अरेबियामधून थेट पाकिस्तानला सेवा उपलब्ध नव्हती. नोव्हेंबरपासून ही सेवा सुरु करण्यात आली असून सौदीमधून थेट पाकिस्तानमध्ये पीआयएची विमानं येतात. प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पीआयएची उड्डाणे इस्लामाबाद, कराची, लाहोर, मुल्तान आणि पेशावरसारख्या शहरांमधून होतात.