शस्त्रे, दारूगोळा याबद्दल त्याला लहानपणापासूनच खूप उत्सुकता. अगदी शाळेत असतानाही त्याने स्वतः तलवार तयार केली होती. पण याच शस्त्रास्त्रांच्या ओढीने तो बेकायदा व्यवसायकडे ओढला गेला आणि त्यातूनच त्याला मालेगाव स्फोटातील आरोपी म्हणून पुढे अटकही झाली. पण याच आरोपीने आता तुरुंगाच्या चार भिंतीत बसून पुस्तके लिहिण्याचा सपाटा लावला असून, आतापर्यंत त्याने ११ पुस्तके लिहून हातावेगळी केली आहेत. या सर्व पुस्तकांचे विषय बघितले तर तेही पारंपरिक आणि आधुनिक शस्त्रे आणि दारूगोळा हेच आहेत.
राकेश धावडे नावाचा हा आरोपी लेखक २००८ पासून मालेगाव स्फोटांप्रकरणी तुरुंगात आहे. पण शस्त्रांबद्दलची उत्सुकता आणि वेड त्याला तिथेही स्वस्थ बसू देत नव्हते. मग त्याने याच विषयावर पुस्तके लिहिण्यास सुरुवात केली आणि त्यातूनच ११ पुस्तकांपर्यंतचा प्रवास पूर्ण झाला. या पुस्तकांमधून त्याने आपल्या जुन्या व्यवसायवरच प्रकाश टाकला आहे. मालेगाव स्फोटातील प्रमुख आरोपी प्रसाद पुरोहित याला शस्त्रास्त्रे पुरविण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी राकेश धावडे याला अटक केली. बेकायदापणे शस्त्रसाठा जमवणे आणि त्याची विक्री करणे, असे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे २००८ पासून तो तुरुंगातच आहे.
‘द इंडियन एक्स्प्रेस’ला राकेशची बहिण नीता हिने दिलेल्या माहितीनुसार, लहानपणापासूनच राकेशला शस्त्रांबद्दल भयंकर उत्सुकता होती. धावडे कुटुंबीयांचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये कार्यरत होते. त्यामुळे परंपरागतपणेच शस्त्रांबद्दलची उत्सुकता त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चालत आली आहे. राकेश पाचवीमध्ये शिकत असताना त्याने स्वतःच एक छोटी तलवार तयार करून इतिहासाच्या शिक्षकांना दाखवली होती. ती तलवार बघूनच त्याच्या शिक्षकांनी राकेशला हे कसे काय तयार केले असा प्रश्न विचारला. त्यानंतर राकेशने आपण आतापर्यंत घरी काय काय बनवले आहे, याची यादीच शिक्षकांपुढे वाचून दाखवली. त्याने तयार केलेल्या वस्तू बघून शिक्षकांनी त्याला शाळेतच एक छोटे प्रदर्शन भरविण्याची सूचना केली. जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना त्याच्या कामाबद्दल माहिती मिळेल, असे नीता यांनी सांगितले.
मालेगाव स्फोटांप्रकरणी अटक झाल्यावर राकेश सुरुवातीला काहीच लिहित नव्हता. आपल्याला लिहिण्याची इच्छा आहे. पण पोलिसांनी आपल्याकडून माहिती काढण्यासाठी केलेल्या मारहाणीमुळे मी हाताने काहीच लिहू शकत नाही, असे त्याने बहिणीला सांगितले होते. पण नंतर त्याने तुरुंगातूनच संशोधन करायला सुरुवात केली आणि लिहायलाही सुरुवात केली, असे त्यांनी सांगितले. एखादी तलवार बघितल्यावर राकेश त्याबद्दल बराच वेळ बोलू शकतो. त्या तलवारीचा इतिहास तो सांगू शकतो, असेही नीता यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passion for arms turns this terror accused into a writer
First published on: 29-08-2016 at 12:55 IST