Patna High Court on PM Modi’s Mother AI video by Bihar Congress : बिहार विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली असताना सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. जाहिराती, भाषणं, मोर्चे आणि इतर मार्गांनी एकमेकांवर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजमाध्यमांवरील पोस्ट, मिम्स, व्हिडीओचा देखील प्रभावी वापर होताना दिसत आहे. अशातच बिहार काँग्रेसने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मातोश्रींचा एआयद्वारे (आर्टीफिशियल इंटेजिन्स) तयार केलेला व्हिडीओ शेअर करण्यात आल्याने राजकारण तापलं आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय की पंतप्रधान मोदी यांची आई त्यांच्या स्वप्नात येते आणि त्यांच्यावर ओरडते. या व्हिडीओनंतर भारतीय जनता पार्टीने काँग्रेसवर टीका केली आहे.

अशा व्हिडीओद्वारे काँग्रेसने खालचा स्तर गाठल्याची टिप्पणी भाजपाने केली आहे. तसेच सदर व्हिडीओ कुणाचाही अनादर करण्यासाठी तयार केलेला नसल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. दरम्यान, हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचलं आहे. याप्रकरणी काँग्रेसविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर पाटणा उच्च न्यायालयात आज (१७ सप्टेंबर) सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने बिहार काँग्रेसला मोदी व त्यांच्या मातोश्रींचा एआयद्वारे बनवलेला व्हिडीओ समाजमाध्यमांवरून हटवण्याचे आदेश दिले आहेत.

व्हिडीओमध्ये नेमकं काय होतं?

बिहार काँग्रेसने साहब के सपनों में आईं “माँ” या कॅप्शनसह ‘एक्स’ (X) वर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, हिराबेन मोदी (पंतप्रधानांच्या मातोश्री) यांच्या एआय प्रतिमेद्वारे मोदींवर निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी त्यांचा वापर केल्याची टीका केली आहे. “अरे बेटा, आधी तू मला नोटाबंदीसाठी लांब रांगेत उभे केलंस, नंतर रील बनवण्यासाठी माझे पाय धुतलेस आणि आता तू बिहारमध्ये माझ्या नावाने रडून राजकारण करत आहेस. तू माझा अपमान करणारे बॅनर आणि पोस्टर्स छापत आहेस. तू पुन्हा बिहारमध्ये तेच करण्याचा प्रयत्न करत आहेस. राजकारणाच्या नावाखाली तू किती खालच्या पातळीवर जाणार आहेस?” असे दिवंगत हिराबेन मोदी पंतप्रधान मोदींना विचारत असल्याचं या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे.

हा व्हिडिओ सर्व महिलांचा अपमान आहे. काँग्रेसने असे व्हिडीओ तयार करून खूप नीच पातळी गाठली आहे, असा आरोप भाजपाने केला होता. तसेच काँग्रेसविरोधात न्यायालयात दाद मागितली होती.