वृत्तसंस्था, पाटणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची दिवंगत माता हिराबेन मोदी यांची कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार केलेली ध्वनिचित्रफित तातडीने हटवावी, असे आदेश पाटणा उच्च न्यायालयाने बुधवारी काँग्रेससह विविध समाजमाध्यमांना दिले. या व्हिडिओमध्ये मोदी यांच्या स्वप्नामध्ये त्यांची दिवंगत आई त्यांना आपला वापर राजकारणासाठी करत असल्याबद्दल रागे भरत असल्याचे चित्रण होते. भाजपने त्या ध्वनिचित्रफितीबद्दल संताप व्यक्त केला होता.

ही ध्वनिचित्रफित बदनामीकारक असल्याचा आरोप करत त्याविरोधात वकील विवेकानंद सिंह आणि इतरांनी अॅड. प्रवीण कुमार यांच्या माध्यमातून १५ सप्टेंबरला जनहित याचिका दाखल केली होती. सध्या पवित्र पितृपक्ष सुरू असून पंतप्रधान मोदी आपल्या मातेसाठी कार्यामध्ये मग्न आहेत, अशा वेळेस ही ध्वनिचित्रफित प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे याचिकाकर्त्यांनी याचिकेत नमूद केले होते. संबंधित ध्वनिचित्रफित लोकप्रतिनिधी कायदा, १९५१च्या कलम १२३(४) अंतर्गत भ्रष्ट व्यवहाराचे उदाहरण असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.

याचिकेवर बुधवारी निकाल देताना प्रभारी मुख्य न्यायाधीश न्या. पी बी बजंथरी आणि न्या. आलोक कुमार सिन्हा यांच्या खंडपीठाने बिहार काँग्रेसला ही ३६ सेकंदांची ध्वनिचित्रफित हटवण्यास सांगितले. ‘मेटा प्लॅटफॉर्म’ (फेसबुक), ‘गुगल इंडिया’ (यूट्यूब) आणि ‘एक्स (ट्विटर) इंडिया’ यांनाही या आदेशाचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले. या ध्वनिचित्रफितीमुळे प्रतिष्ठेच्या अधिकाराचा भंग होत असल्याचे उच्च न्यायालयाने नमूद केले.