सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत राफेल विमानांचा मुद्दा चांगलाच चर्चेत असल्याचे दिसत आहे. राफेल करारावरुन विरोधक सकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत तर सरकार विरोधकांवर राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून घेरताना दिसत आहे. या सर्व आरोप प्रत्यारोपामुळे राफेल हे नाव जवळजवळ प्रत्येक भारतीयाला ठाऊक झाले आहे मात्र ते नकारात्मक बातम्यांमुळे. यामुळेच छत्तीसगडमधील राफेल गावातील लोकांनी या बदनामीला कंटाळून गावाचे नाव बदलण्याची मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्तीसगडमधील महासमंद मतदारसंघामध्ये राफेल नावाचे गाव आहे. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच १८ एप्रिल रोजी या गावातील गावकरी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २०० कुटुंबाची वस्ती असलेले हे गाव त्याच्या नावामुळे राफेल प्रकरणानंतर पंचक्रोषीमध्ये मस्करीचा विषय ठरले आहे. ‘आजूबाजूच्या गावातील लोक गावाच्या नावामुळे आमची थट्टा करतात. काँग्रेस सत्तेत आल्यास राफेलची म्हणजेच आमच्या गावाची चौकशी होणार आहे असं म्हणत आमची मस्करी केली जाते. गावाचे नाव बदलण्यात यावे अशी आमची मागणी आहे. आम्ही यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातही गेले होतो. मात्र आमची मुख्यमंत्र्यांशी भेट होऊ शकली नाही,’ असं गावातील सर्वात वयस्कर नागरिक असणाऱ्या ८३ वर्षांच्या धरम सिंग यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. ‘राफेल प्रकरणामुळे आमच्या गावाला नकारात्मक प्रसिद्धी मिळत आहे. आमच्या गावाची कोणालाही काळजी नसून ते केवळ मस्करीचा विषय झाले आहे. राज्याबाहेरच्या अनेकांना आमच्या गावाबद्दल ठाऊक नसले तरी पंचक्रोषीत आमच्याकडे थट्टेचा विषय म्हणून पाहिले जात आहे,’ अशी खंत धरम सिंग यांनी बोलून दाखवली.

राफेल प्रकरणामुळे या गावाकडे आजूबाजूच्या गावांचे लक्ष वेधले गेले असले तरी तरी गावामध्ये साध्या नागरी सुविधांचाही आभाव असल्याचे दिसून येते. प्यायचे पाणी, स्वच्छता यासारख्या सुविधाही गावामध्ये उपलब्ध नसल्याचे चित्र दिसत आहे. राफेलमधील नागरिक आजही पाण्यासाठी पावसावरच अवलंबून आहेत. पाऊस पडला तर ठीक नाहीतर त्यांना वर्षभर पाणीटंचाईचा समाना करावा लागतो.

देशातील अनेक राजकारणयांनी अनेक गावे दत्तक घेतली आहेत. मात्र आमच्या गावाची साधी पहाणी करायलाही कोणी आले नाही. काही दिवसांपूर्वी भाजपाचे काही लोक गावात आले होते. मात्र ते सामान्य कार्यकर्तेच होते. त्यामुळे जो उमेदवार निवडणुक जिंकेल त्याने आमच्या गावचे नाव बदलावे हीच आमची मुख्य मागणी आहे असं सिंग सांगतात. या गावाला राफेल नाव कशावरुन पडले आणि त्याचा अर्थ काय हे गावातील सर्वात वयस्कर नागरिक असणाऱ्या धरम सिंग यांनाही ठाऊक नाही. ‘आमच्या गावचे नाव राफेल कशावरुन ठेवण्यात आले याबद्दल माझ्याकडे कोणतीही माहिती नाही. मागील अनेक दशकांपासून गावाचे नाव राफेलच आहे. २००० साली छत्तीसगड राज्य अस्तित्वात येण्याआधीपासूनच गावाचे नाव राफेल आहे. पण या नावामागील कारण मला ठाऊक नाही,’ असं धरम सिंग सांगतात.

राफेल गाव ज्या महासमंद मतदारसंघामध्ये आहे त्या मतदारसंघातून सध्याचे भाजपाचे विद्यमान खासदार चंदूलाल शाहू हेच पुन्हा खासदारकीची निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्याविरोधात काँग्रेसने धनेंद्र शाहू यांना तर बहुजन समाज पक्षाने धनसिंग कोसरिया यांना निवडणुकीचे तिकीट दिले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People of rafel village want to change its name because they cant take the blame anymore
First published on: 16-04-2019 at 08:59 IST