देशातील तरुण वर्ग आयसिसकडे कसा काय आकर्षित होतो आहे, असा प्रश्न उपस्थित करून आपण कुठेतरी कमी पडत असल्याची शक्यता शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केलीये. ‘एएनआय’शी बोलताना त्यांनी देशातील तरुण आयसिसच्या प्रभावाखाली येण्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर इस्लाम प्रेम आणि शांततेचा संदेश देत असूनही देशात रोजच अतिदक्षतेचा इशारा द्यावा लागतोय, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांनी कडक पावले उचलली पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


झाकीर नाईक यांच्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर अशा व्यक्तींवर बंदीच घातली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ज्या व्यक्तींच्या चिथावणीखोर भाषणांमुळे देशाची एकात्मता धोक्यात येते. त्यांच्यावर बंदीच घालायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे. या व्यक्ती त्याच्यापुढे जाऊनही कृती करतात. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवले पाहिजे. आपण केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवणार असून, चिथावणीखोर वक्तव्य करणारे लोक आणि त्यांच्या प्रभावत येणाऱ्या तरुणांवर सातत्याने लक्ष ठेवण्याची मागणी करणार आहोत, असे अरविंद सावंत म्हणाले.
गेल्या आठवड्यात ढाक्यामध्ये झालेल्या हल्ल्यामागे झाकीर नाईक यांची चिथावणीखोर वक्तव्य असल्याचे एका अहवालातून पुढे आले होते. त्यानंतर सरकार केवळ संघटनांवर बंदी घालू शकते, व्यक्तींवर घालू शकत नाही, असे केंद्राने स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी वरील प्रतिक्रिया दिली.